कोकण किनारपट्टीवर उद्यापासून सलग तीन दिवस ‘तौकते’ चक्रीवादळ येणार असून 16 व 17 मे या दोन दिवसात मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी पावसासह ताशी 70 कि.मी. या वेगाने वारे वाहणार आहे. यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व चौपाट्यांवर 93 लाईफगार्डची नियुक्ती केली आहे. याशिवाय आपात्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी साधनसामग्रीसह सहा अग्नीशमन केंद्रावर देखील जवानांची नेमणूक केली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा किनारपट्टीपासून गुजरातपर्यंतचा भाग वादळाच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. सतर्कतेचा इशारा व सावधगिरी म्हणून मुंबईतील नरिमन पॉइंट, नाना चौक, दादर, अंधेरी, कुर्ला, मालाड, बोरिवली अशा विविधआपत्कालीन अग्निशमन केंद्रांवर जवान ठेवण्यात आले आहेत.
चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून जम्बो कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागातील 395 रुग्णांना महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात स्थलांतरीत केले जाणार आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. मच्छीमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.