बीड : बीड जिल्हयातील शिरुर कासार या गावी विशाल कुलथे हा तरुण सराफ व्यावसायिक रहात होता. वाडवडीलांचा पारंपारिक सराफी व्यवसाय प्रामाणीकपणे करण्याचे बाळकडू त्याला आपल्या वडीलांकडून मिळाले होते. सराफी व्यवसाय करण्यात विशाल चांगल्या प्रमाणात पारंगत झाला होता. नवनविन डिझाईनचे सोन्या- चांदीचे दागिने ग्राहकांच्या पसंतीस उतरवण्याची कला विशाल यास चांगल्याप्रकारे अवगत झाली होती. एकंदरीत त्याचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरु होता. दरम्यान कोरोनाची पहिली लाट आली. या कालावधीत विशालचे दुकान बंद होते.
कोरोनाची पहिली लाट जेमतेम ओसरल्यानंतर आता सर्व काही सुरळीत झाले असे सर्वच व्यावसायीकांना वाटत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जेमतेम रुळावर आलेली व्यवसायाची गाडी पुन्हा बिघडली. सरकारी नियमानुसार अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेल्या उद्योगधंद्यांनी मे महिन्यात पार तळ गाठला. त्याला विशाल कुलथे याचा व्यवसाय देखील अपवाद नव्हता. राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या दुस-या लाटेत इतर दुकानांप्रमाणे सराफी दुकाने देखील बंद करावी लागली. नाईलाजाने विशाल कुलथे यास आपले दुकान बंद करावे लागले. कोरोनाची साखळी तोडता तोडता रोजगाराची साखळी तुटण्याची वेळ जवळपास सर्वच व्यावसायीकांवर आली.
अशातच शिरुर कासार येथील नाभिक व्यावसायिक ज्ञानेश्वर गायकवाड याचा त्याला निरोप आला. लॉकडाऊन कालावधीत आपले लग्न झाले असून पत्नीला देण्यासाठी पाच तोळे सोन्याचे दागिने हवे असल्याचा तो निरोप होता. लॉकडाऊन काळात मिळालेली दागिन्यांची ऑर्डर जणू काही अंधारात आशेचा किरण असल्याचा समज विशालने मनाशी केला. मात्र ही ऑर्डर म्हणजे मृत्युची घंटा असल्याचे केवळ नियतीला माहित होते. ही ऑर्डर म्हणजे आपली मृत्यूच्या दिशेने वाटचाल असल्याचे विशालच्या लक्षात आले नाही. याचे कारण म्हणजे नियतीच्या मनात काय आहे याचा ठाव कुणालाही लागत नसतो.
विशालच्या ताब्यातील दागिने हिसकावून त्याला ठार करण्याचे नियोजन नाभिक व्यावसायिक ज्ञानेश्वर गायकवाड याने मनाशी केले होते. ऑर्डरप्रमाणे तयार झालेले दागिने घेऊन विशाल यास आपल्या केस कर्तनालयात बोलावून ठार करण्याचे नियोजन ज्ञानेश्वरने मनाशी केले होते. याकामी विशाल यास त्याचे वडील शिवाजी हरीभाऊ गायकवाड यांच्यासह त्याचे मित्र धिरज मांडकर आणी केतन लोमटे यांची साथ मिळणार होती. दागिने लवकर तयार करण्यासाठी ज्ञानेश्वरने विशाल यास पाच हजार रुपयांची आगाऊ रक्कम देखील दिली होती. ज्ञानेश्वर गायकवाड हा अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील रहिवासी होता. गेल्या काही वर्षापासून तो त्याच्या मामाच्या गावी शिरुर कासार येथे केस कर्तनालयाचा पारंपारिक व्यवसाय करण्यास आला होता. नाभिक समाजाचा ज्ञानेश्वर याच्या मामांचे शिरुर कासार येथे हेअर कटींग सलून आहे.
लवकरात लवकर दागिने तयार करुन रक्कम मिळवण्यासाठी विशाल झपाटयाने कामाला लागला होता. विशालच्या जिवनातील ही शेवटची फसवी ऑर्डर होती. या ऑर्डरच्या माध्यमातून त्याची मृत्यूच्या दिशेने वाटचाल सुरु होती. अखेर विशालने रात्रंदिवस मेहनत करुन ऑर्डरनुसार सर्व दागिने तयार केले. आता त्याला ज्ञानेश्वरच्या दुकानावर दागिने देऊन मालाची रक्कम घ्यायचे काम बाकी होते. दागिने तयार झाल्याचे विशालने ज्ञानेश्वरला फोन करुन कळवले. अजुन काही नवीन डिझाईनचे दागिने असल्यास ते देखील घेऊन येण्यास ज्ञानेश्वरने विशाल यास सांगितले. त्याच्या निरोपानुसार 20 मे 2021 रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजेच्या दरम्यान विशाल सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे बॉक्स घेऊन ज्ञानेश्वरकडे गेला. विशाल येणार असल्याचे माहीती असल्यामुळे तो येण्यापुर्वीच ज्ञानेश्वरने त्याच्या हत्येचे व दागिने लुटीचे सर्व नियोजन करुन ठेवले होते.
विशाल आल्यानंतर ज्ञानेश्वरने त्याचे सलुन दुकान उघडले. विशाल दुकानात आल्यानंतर ज्ञानेश्वरने दुकान आतून पटकन बंद करुन घेतले. दुकानात ज्ञानेश्वरचे वडील शिवाजी हरीभाऊ गायकवाड यांच्यासह त्याचे मित्र धिरज अनिल मांडकर व केतन संतोष लोमटे असे एकुण चौघे जण हजर होते. विशाल दागिने दाखवत असतांना या ज्ञानेश्वरसह केतन लोमटे व धिरज मांडकर या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. विशाल जिवाच्या आकांताने ओरडणार हे गृहीत धरुन शिवाजी गायकवाड व केतन लोमटे या दोघांनी मिळून त्याचे तोंड दाबून ठेवले. ज्ञानेश्वर व धिरज या दोघांनी त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली. तोंड व गळा दाबला गेल्यामुळे विशालचा श्वास कोंडला गेला. तो बेशुद्ध पडण्यास वेळ लागला नाही. विशाल बेशुद्ध होताच ज्ञानेश्वरने दुकानातील कात्री हातात घेतली. केस कापण्याच्या त्या धारदार कात्रीने ज्ञानेश्वरने विशालच्या गळ्यावर जोरदार वार केले. गळ्यावर कात्रीचे वार झाल्यामुळे अगोदरच बेशुद्ध पडलेल्या विशालच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. काही वेळातच विशाल मृत्यूच्या दारात जाऊन पडला. रात्रंदिवस मेहनत करुन त्याने तयार केलेले दागिने आणी त्याचा लाख मोलाचा जिवदेखील गेला होता. मयत विशालने आणलेल्या दागिन्यांची लुट झाली होती. त्यानंतर बराच वेळ विशालचा मृतदेह पडून होता. याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार सुरु होता.
मयत विशाल कुलथे याची आपण हत्या केली आहे याची कुणालाही शंका येऊ नये यासाठी ज्ञानेश्वर गायकवाड याने एक शक्कल लढवली. त्याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत एका गोधडीत भरुन ठेवण्यात आला. मयत ज्ञानेश्वरचा भाऊ कैलास कुलथे याचे मेडीकल दुकान आहे. त्या दुकानावर साधारण रात्री आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर कैलास कुलथे याला भेटण्यासाठी गेला. त्याने मुद्दाम कैलास यास विशालची विचारपुस आणि चौकशी केली. त्याच्याकडे काही वेळ मुद्दाम गप्पा केल्यानंतर ज्ञानेश्वर हा पुन्हा दुकानाकडे आला.
आता विशालच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची या नियोजनात ज्ञानेश्वरसह त्याचे वडील शिवाजी गायकवाड, धिरज मांडकर व केतन लोमटे असे सर्वजण लागले. रात्र झाल्यानंतर ज्ञानेश्वरसह सर्वांनी मिळून विशालचा मृतदेह एका गोधडीत भरला. गोधडीतील तो मृतदेह ज्ञानेश्वर आणि केतन लोमटे यांनी मोटारसायकलने अहमदनगर जिल्ह्यातील भातकुडगाव येथे वाहून नेला. दुस-या मोटारसायकलने त्यांच्यासमवेत शिवाजी गायकवाड आणि धिरज मांडकर असे दोघेजण आले. भातकुडगाव येथे शिवाजी गायकवाड यांचे शेत आहे. त्या शेतात त्यांनी एक खड्डा केला. त्या खड्ड्यात रातोरात चौघांनी मिळून विशाल कुलथे याचा मृतदेह पुरला. खड्डा तयार करण्याकामी व मृतदेह पुरण्याकामी शिवाजी गायकवाड याने मदत केली. कुणाला संशय नको म्हणून शेतात ट्रॅक्टर फिरवून सर्व शेत नांगरुन टाकण्यात आले. अशा प्रकारे मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात सर्व जण शिरुर कासार गावात नंतर फिरु लागले. आपला गुन्हा पचला अशी मनाची समजूत करत विशालकडून लुबाडलेले दागिने त्यांनी आपसात वाटून देखील घेतले.
घटनेच्या दिवशी घरातून गेलेला विशाल घरी आलाच नाही. रात्र बरीच झाली तरी विशाल घरी परत आला नाही म्हणून त्याच्या घरातील सदस्य चिंतातुर झाले. ऑर्डरचे दागिने देण्यास गेलेला विशाल घरी आला नाही त्यामुळे त्याच्या घरातील सदस्यांनी ज्ञानेश्वरला देखील विचारपुस केली. मात्र त्याने तो येथुन केव्हाच गेला असे सांगून सर्वांची बोळवण केली. आपल्यावर कुणाचा संशय नको म्हणून मयत विशालचा भाऊ कैलास यास ज्ञानेश्वर मुद्दाम फोन करु लागला. विशाल कुठे आहे? तो घरी आला नाही का? कुठे गेला असेल बरे? त्याचे व पत्नीचे काही वाद झाले आहे का? असे विनाकारण प्रश्न कैलास यास फोनवर विचारुन ज्ञानेश्वर स्वत:ची बाजू सुरक्षीत करुने घेण्याचा प्रयत्न करत होता.
21 मे रोजी दुसरा दिवस उजाडला तरी विशाल घरी आला नाही. हवालदिल झालेल्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र प्रत्येकाच्या पदरी निराशाच आली होती. अखेर विशालचा भाऊ कैलास याने शिरुर कासार पोलिस स्टेशन गाठत भाऊ विशाल कुलथे हरवल्याबाबत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार शिरुर कासार पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली. विशालचा मोबाईल देखील लागत नव्हता. विशाल ज्ञानेश्वरकडे दागिने देण्यास व दाखवण्यास गेला होता एवढेच प्रत्येकाला माहिती होते.
मिसींग दाखल होण्यापुर्वी काही दिवस अगोदर विशाल आणि ज्ञानेश्वर असे दोघे एकाच मोटारसायकलवर फिरतांना कैलासने पाहिले होते. तो संदर्भ घेत कैलासने शिरुर कासार पोलिसांच्या लक्षात ही बाब आणून दिली. शिरुर कासार पोलिस स्टेशनचे पो.नि.सिद्धार्थ माने यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात विशाल आणी ज्ञानेश्वर असे दोघे जण मोटारसायकलवर डबलसिट फिरतांना आढळून आले. त्यानुसार चौकशीकामी ज्ञानेश्वरला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. मात्र त्याने पोलिसंची दिशाभुल करण्यास सुरुवात केली. घटनेच्या रात्री मी आठ वाजेच्या सुमारास विशालचा भाऊ कैलास यास त्याच्या मेडीकल दुकानावर जावून भेटलो होतो. हवे तर त्याला विचारा असे म्हणत त्याने शिरुर कासार पोलिसांची दिशाभुल करण्यास सुरुवात केली. मात्र तुझे आणी विशालचे मोटारसायकलवर सोबत फिरत असतांनाचे फोटो आमच्याकडे आहेत असे त्याला म्हटले असता ज्ञानेश्वरने पोलिसांना म्हटले की आपले म्हणणे बरोबर आहे. मी त्याला शहरातील मुख्य चौकापर्यंत सोडले होते. त्यानंतर तो पुढे गेला. त्याला काही पारधी लोकांनी बळजबरी चारचाकी वाहनात बसवून नेले असे सांगून त्याने पुन्हा पोलिसांची दिशाभुल करण्यास सुरुवात केली. शिवाय त्याने काही पारध्यांची नावे देखील सांगून टाकली. त्यामुळे त्याला त्यादिवशी चौकशी करुन सोडून देण्यात आले. शिरुर कासार पोलिसांचा तपास काही प्रमाणात भरकटला होता. पारधी जमातीच्या दिशेने तपास सुरु करण्यात आला होता. मात्र त्यात देखील फारसे काही निष्पन्न झाले नाही.
अखेर बिड जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी पुढील तपासाची समांतर धुरा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.भारत राऊत यांचेकडे सोपवली. पो.नि. भारत राऊत यांनी या गुन्ह्याचा संपुर्ण अभ्यास केला. त्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवली. ज्ञानेश्वर याने शिरुर कासार पोलिसांची दिशाभुल केल्याचे एलसीबीचे पो.नि.भारत राऊत यांच्या पारखी नजरेने हेरले. घटनेच्या रात्री ज्ञानेश्वर हा घरीच होता असे त्याने खोटे कथन केले होते. मात्र घटनेच्या रात्री उशीरा तो त्याच्या मुळगावी नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे जावून पुन्हा शिरुर कासार येथे आला असल्याची माहिती पो.नि. भारत राऊत यांनी संकलीत केली होती.
आता संशयाची सुई ज्ञानेश्वर गायकवाड याच्याभोवती फिरु लागली होती. तो पोलिसांची दिशाभुल करत असल्याची पक्की खात्री पो.नि. भारत राऊत यांना झाली होती. त्यांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. विशाल बेपत्ता होण्याच्या आधी व नंतरच्या कालावधीत विशालचा कुणाकुणासोबत संपर्क आला याची माहिती संकलीत करण्यात आली. गावातील लोकांकडून व काही गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली. चौकशीकामी ज्ञानेश्वरचे वडील शिवाजी गायकवाड यांचीदेखील कसून चौकशी करण्यात आली. ते देखील आपल्यापासून माहिती लपवत असल्याचे पो.नि.राऊत यांना जाणवले. एका गुप्त बातमीदाराकडून पो.नि.भरत राऊत यांना समजले की घटनेच्या 20 मे रोजीच्या रात्री ज्ञानेश्वर एका जणाला फावडे मागत होता. एवढ्या रात्री ज्ञानेश्वर फावडे का मागत असेल? रात्रीच्या वेळी त्याला फावड्यांची तात्काळ गरज का भासली. तो दिवसा फावडे मागू शकत नव्हता का? या प्रश्नांनी पो.नि. भरत राऊत यांच्या डोक्यात ज्ञानेश्वर फिट बसला. ज्ञानेश्वरनेच विशालची हत्या केली असावी आणि त्याला पुरुन टाकण्यासाठीच त्याला फावड्यांची गरज पडली असेल अशी धारणा पो.नि. भरत राऊत यांची झाली.
22 मे 2021रोजी पो.नि.भारत राऊत यांनी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर गायकवाड याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचा संशय जवळपास खरा ठरला होता. तो आदल्या दिवशी 21 मे रोजीच पळून गेला होता. ज्ञानेश्वरच्या संपर्कात असलेल्यांची नावे पो.नि.भारत राऊत यांनी निष्पन्न केली होती. त्यानुसार क्रमाक्रमाने संतोष लोमटे, धिरज मांडकर व ज्ञानेश्वरचे वडील शिवाजी गायकवाड या तिघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. तिघांना आवश्यकतेनुसार योग्य रितीने पोलिसी खाक्या दाखवण्याची वेळ जवळ आली होती. पोलिसी खाक्या दाखवून झाल्यानंतर तिघांची स्वतंत्र आणी संयुक्त पद्धतीने चौकशी करण्यात आली. या चौकशीत पो.नि.भारत राऊत यांना धक्कादायक माहिती मिळाली.
ज्ञानेश्वरसह चौघांनी मिळून विशालची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. हत्या केल्यानंतर विशालचा मृतदेह भातकुडगाव येथील शेतात पुरुन टाकल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील तिघांनी दिली. या माहितीच्या आधारे रविवार दि. 23 मे रोजी भातकुडगाव येथील शेतात पुरलेला मृतदेह शोधण्याचे काम सुरु करण्यात आले. आरोपींनी सर्व शेत नांगरुन टाकले होते. त्यामुळे मृतदेह शोधण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अथक प्रयत्नानंतर विशालचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिस पथकाला यश आले. घटनास्थळाचा पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई पुर्ण करण्यात आली. मृतदेह रासायनिक पृथ:करणासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड मात्र फरारच होता.
आतापर्यंत विशाल बेपत्ता असल्यामुळे त्याच्या मिसींगचा तपास सुरु होता. त्याचा मृतदेह शेतातून पुरलेल्या अवस्थेतून बाहेर काढल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा कैलास कुलथे याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरुर कासार पोलिस स्टेशनला गु.र.न. 63/21 भा.द.वि.302, 365, 397, 201, 34 नुसार दाखल करण्यात आला. अटकेतील संतोष लोमटे, धिरज मांडकर व ज्ञानेश्वरचे वडील शिवाजी गायकवाड या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान धिरज मांडकर याच्या ताब्यातून चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
फरार ज्ञानेश्वर गायकवाड हा त्याचा मामा अजिनाथ गायके यांच्याकडे केस कर्तन करण्यासाठी कामाला होता. मामा अजिनाथ गायके यांच्या कृपेने तो शिरुर कासार येथे स्थायिक झाला होता. ज्ञानेश्वर हा अजिनाथ गायके यांचा भाचा होता. आपल्या भाच्याने खून केल्याचे समजल्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला. आपली समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याची त्यांची भावना झाली. या धक्क्यातून त्यांना सावरता आले नाही. त्यामुळे त्यांनी 25 मे रोजी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. दरम्यान विशाल कुलथे याचे आजोबा सुधाकर कुलथे यांना देखील आपल्या नातवाच्या हत्येच्या बातमीने कासाविस करुन सोडले. लाडक्या नातूचा खून झाल्याचे समजताच त्यांना दुख: अनावर झाले. नातवाच्या खूनाचे दुख: अनावर झाल्यामुळे शोकमग्न अवस्थेत त्यांनी आपले प्राण सोडले. ते अनंताच्या वाटेवर नातवाच्या भेटीला निघून गेले. अशा प्रकारे या खूनामुळे एकाच वेळी दोन परिवारात आत्महत्या आणी मृत्यू अशा दोन दुख:द घटना घडून आल्या. लागोपाठ घडलेल्या या घटनांनी बिडवासीय हळहळले.
या घटनेतील तिघे आरोपी अटकेत असले तरी मुख्य संशयीत ज्ञानेश्वर गायकवाड हा फरारच होता. त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भरत राऊत व त्यांचे सहकारी मागावर होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार तो औरंगाबाद येथील वाळूज व जोगेश्वरी परिसरात असल्याचे तपास पथकाला समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक त्याच्या मागावर औरंगाबाद येथे गेले. मात्र त्याला सुगावा लागल्यामुळे तो तेथून देखील फरार होण्यात यशस्वी झाला होता.
फरार ज्ञानेश्वर गायकवाड याचे गेल्या एक महिन्यापुर्वी नाशिकच्या एका नर्स सोबत लग्न झाले होते. पेशाने नर्स असलेली त्याची पत्नी नाशिक येथे नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर एका दवाखान्यात कामाला लागली होती. तिच्याकडे जाऊन तपास केला असता तो तेथेही आढळला नाही. त्यामुळे तपास पथक पुन्हा माघारी परतले. अखेर 31 मे रोजी त्याला ताब्यात घेत अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले. तो नाशिकच्या अरिंगळे मळा येथे वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला नाशिकच्या अरिंगळे मळा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. पोलिस निरिक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद वाघ, रघुनाथ शेगर, रवींद्र बागूल, नाझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे, फय्याज सय्यद, महेश साळुंके, असिफ तांबोळी, विशाल देवरे यांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. तो त्याच्या नवविवाहीत पत्नीसह तेथे वास्तव्य करत होता. 11 तोळे सोने व 4 किलो चांदी असा एकुण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची व विशालची हत्या केल्याची त्याने कबुली दिली. या गुन्ह्यात त्याला त्याचे वडील शिवाजी हरीभाऊ गायकवाड, केतन संतोष लोमटे व धिरज अनिल मांडकर यांची साथ लाभल्याचे देखील त्याने कबुल केले. विशाल कुलथे याची हत्या केल्यापासून पुर्ण घटनाक्रम त्याने कबुल केला. त्याच्या कबुली जवाबात मात्र त्याने साधारण अडीच महिन्यापुर्वी केलेला खूनाचा गुन्हा देखील कबुल केला. यापुर्वीच्या गुन्ह्यात देखील त्याला केतन संतोष लोमटे याची साथ लाभली होती. या गुन्ह्यात व पुर्वीच्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर गायकवाड आणी केतन लोमटे हे सामायीक संशयीत आरोपी निष्पन्न झाले आहेत. नव्याने लग्न केलेली नर्स ही तुझी कितवी पत्नी आहे असे त्याला विचारले असता त्याची बोबडी वळली व त्याने पुर्वी केलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला.
ज्ञानेश्वर गायकवाड हा अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मुळ रहिवासी होता. त्याने गावात एकदा मुलींची छेड काढली होती. त्यावेळी त्याला पब्लिक मार पडला होता. त्यामुळे त्याची रवानगी त्याच्या मामाच्या गावी शिरुर कासार येथे करण्यात आली. मामा अजिनाथ गायके यांनी त्याला आश्रय देत केस कर्तनाचे धडे दिले. मामाच्या दुकानात राहून त्याला केसकर्तनाचे प्रशिक्षण मिळाले. आलेल्या ग्राहकांचे केस कापून तो कटींग शिकला. दरम्यान सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याची शितल भामरे या नाशिकच्या दोन मुलांच्या आईसोबत ओळख झाली. तो तिच्या प्रेमात पडला. प्रेमात पडल्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मधे शिरुर कासार येथे सोबत राहू लागले. सुरुवातीला दोघांचे तसे चांगले सुरु होते.मात्र काही दिवसांनी तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. या संशयातून तो तिला मारहाण देखील करु लागला. त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे शितलने त्याला म्हटले की मला पुन्हा नाशिकला सोडून दे. ती परत नाशिकला जाण्याचा तगादा लावत असल्यामुळे त्याने तिला केतन लोमटेच्या मदतीने नाशिकला सोडून देण्याचे ठरवले. गुन्हेगारी वृत्ती अंगात असलेल्या ज्ञानेश्वरने तिला 15 मार्च रोजी नाशिकला सोडण्यासाठी जाण्याचे नियोजन केले. त्याने त्याच्यासोबत केतन लोमटे याला देखील सोबत घेतले होते. तिला सोडण्यासाठी जात असतांना केतन लोमटे याच्या मदतीने वाटेत राहुरी कारखान्याजवळ तिला दगडाने ठेचून ठार करण्यात आले. तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला. त्यामुळे तिची ओळख पटेनासी झाली होती. याप्रकरणी राहुरी पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध अज्ञात कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च महिन्यात शितल भामरे हिचा खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात दुसरे लग्न केले होते.
विशालचा खून केल्यानंतर दुस-या पत्नीसोबत त्याने लॉकडाऊन कालावधीत शिरुर ते नाशिक असा सुमारे तिनशे किलोमिटरचा प्रवास मोटारसायकलने केला. सिमाबंदी व चेकनाके या सर्वांना चकवा देत त्याने नाशिक गाठले. पत्नीच्या मदतीने भाड्याची खोली घेत त्याने बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशिकमधे बस्तान बसण्याआधीच पोलिसांनी त्याचे बस्तान उठवले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्यासह बालाजी दराडे, विकास वाघमारे, गणेश हंगे, संगीता शिरसाट, काळे, संजय जायभाये यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या तपासकामात त्यांना नाशिकच्या क्राइम ब्रँच युनिट एकची मोलाची मदत झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी विजय लगारे व त्यांचे सहकारी करत आहेत.