ठाणे : लॉकडाऊनमधे ज्याप्रमाणे सर्व सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले त्याप्रमाणे बड्यांना देखील आर्थिक फटका बसला. मात्र हे अवघड दुखणे कुणी उघड केले तर कुणी केले नाही. नवोदीत अभिनेत्रींसह छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींना देखील या लॉकडाऊनचा फटका बसला. काम मिळत असतांना सतत येणारा पैशांचा ओघ आटला. त्यातच छानछोकीत राहण्याचा सराव असल्यामुळे लॉकडाऊनमधे सर्वच अर्थचक्र थांबले.
ठाण्यात बुधवारी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. त्यात काही सिने अभिनेत्रींचा सहभाग होता. पकडण्यात आलेल्या सिने अभिनेत्रींना कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत काम मिळत नव्हते. सुरु असलेली आर्थिक चणचण दुर करण्यासाठी या अभिनेत्री पैशांच्या मोहात पडून सेक्स रॅकेटमधे ओढल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपाखाडातील एका गृहसंकुलनात सुरु असलेल्या गैरप्रकाराची माहिती समजली होती. त्याठिकाणी ‘हसिना मेनन’ नावाची महिला घरमालकीन ‘स्वीटी’ला मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींचा देहविक्रीसाठी पुरवठा करत होती. या माहीतीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने नियोजन करत धाड टाकली.
दोन बनावट (पंटर) ग्राहक त्या ठिकाणी रवाना करुन त्यांनी दोन तरुणींची मागणी केली. त्यावेळी प्रत्येक तरुणीसाठी दोन लाख रुपये लागतील असे त्यांना सांगण्यात आले. मात्र घासाघीस करत तडजोडीअंती प्रत्येकी 80 हजार रुपयांचा व्यवहार ठरला. गुन्हा अन्वेषण पथकाने अतिरीक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या निर्देशाखाली सदर छापा यशस्वी करण्यात आला.
सुनिल आणि हसिना या दोघांसह हसिनाची घरमालकीन स्वीटीला ताब्यात घेत त्यांच्यावर अनैतिक व्यापर प्रतिबंधक अधिनियमानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील तिघांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. लॉकडाऊन कालावधीत काम मिळेनासे झाल्यामुळे गरजू अभिनेत्री या सेक्स रॅकेटमधे सहभागी झाल्या होत्या.