अकोला – कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणी दोघे अधिकारी आज अडकले. अकोला एसीबीने हा सापळा रचला होता. विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी दोन लाख रूपयांची तक्रारदाराकडून लाच स्विकारली.
तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे तकार दिली होती. तक्रारीनुसार त्यांचे स्वत:चे व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वतन आयोगानुसार वेतन निश्चिती आणि फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे काम होते. त्यासाठी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत पाच अेरियस रकमेच्या ५0 टक्के रकमेची प्रथम मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदारास पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांनी पडताळणी केली. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत तक्रारदाराला लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. या रकमेपैकी अर्धी रक्कम देण्याबाबत सहमती झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. सापळा रचला असतांना विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रूपयांची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.