सासु – सुनेचे नव्हतेच जमत, वाद नव्हता शमत ! विळ्याच्या घावासह उज्वलाने दाखवली हुकुमत!!

जळगाव : रविंद्र पंढरीनाथ सोनवणे हा भुसावळ येथील पद्मबाई कपुरचंदजी कोटेचा महिला विद्यालयात वाचमन म्हणून कामाला आहे. गेल्या आठ महिन्यापासून तो या शाळेत वाचमनची नोकरी करत आहे. तो काम करत असलेल्या शैक्षणिक संस्थेने त्याला शाळेच्या आवारात राहण्यास एक खोली दिली होती. या खोलीत तो, त्याची पत्नी उज्वला व आई द्वारकाबाई यांच्यासह रहात होता.

सुमारे बाविस वर्षापुर्वी रविंद्रचा विवाह चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी येथील उज्वला सोबत समाजाच्या रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर रविंद्र आणि उज्वला यांचा संसार सुखाने सुरु होता. दोघांचा फुलत जाणारा संसार बघून द्वारकाबाईच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते. आपल्या मुलाचा सुखी संसार बघून द्वारकाबाई तिचा मुलगा आणी सुन यांना “सुखी रहा” असा आशिर्वाद देत असे. “लवकरच पाळणा हलू द्या” असा मंत्र देखील द्वारकाबाई दोघा पती पत्नीला देत होती. या मंत्राचा आधार घेत दोघे पती – पत्नी त्यांच्या संसारात तिस-या पाहुण्याच्या आगमनाच्या नियोजनात लागले होते.

लग्नानंतर काही दिवसातच उज्वला गर्भवती झाली. उज्वला गर्भवती झाल्यामुळे दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. उज्वलाचे पहिले बाळंतपण असल्यामुळे तिच्या आईने तिला माहेरी चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी येथे नेले.  पहिल्या बाळंतपणाच्या वेळी उज्वलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र मुलाच्या जन्माचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. जन्मानंतर काही वेळातच उज्वलाच्या मुलाचे दुर्दैवी निधन झाले. त्या मुलाची जिवनरेखा अतिशय अल्पजिवी ठरली. बाळंतपणानंतर शुद्ध आल्यावर उज्वला हिस आपला मुलगा मयत असल्याचे समजले. त्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला. आपले बाळ मयत असल्याचे समजल्यानंतर बसलेला मानसिक धक्का ती सहन करु शकली नाही. तिला सतत बडबड करण्याची सवय जडली. सासू द्वारकाबाई समोर दिसली म्हणजे मी तुला जिवंत सोडणार नाही असे ती म्हणू लागली. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. तिचे बिघडलेले मानसिक संतुलन बघून इकडे रविंद्रचे मानसिक संतुलन बिघडण्याची वेळ येत असे. मात्र तो स्वत:ला सावरुन कामाला लागत असे.

बाळंतपणासाठी माहेरी गेलेली उज्वला सासरी बाळाविना परत आली होती. झाले गेले विसरुन आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करण्यास रविंद्रने उज्वलास सांगितले. ती आपल्या संसारात रमण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र तिची बिघडलेली मानसिकता दुरुस्त होण्याचे नाव काही घेत नव्हती. कालांतराने घरात पुन्हा पाळणा हलण्यासाठी रविंद्रने उज्वलासोबत नियोजन सुरु केले. यावेळी त्याचे व तिचे नियोजन यशस्वी झाले. दोघांच्या संसारवेलीवर एका कन्यारत्नाचे आगमन झाले. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनीच त्यांच्या घरातील पाळणा हलला. दुस-या वेळी देखील रविंद्र आणि उज्वला यांच्या संसारवेलीवर कन्यारत्नाचेच आगमन झाले.

द्वारकाबाईचा मृतदेह

कालचक्र कधी हळू तर कधी वेगाने सरकत होते. काळानुरुप उज्वला व रविंद्र यांची मोठी मुलगी लग्नायोग्य झाली. त्यांनी तिचे लग्न एका सुस्वरुप तरुणासोबत लाऊन दिले. दुसरी मुलगी शिक्षणासाठी मामाच्या घरी राहू लागली. त्यामुळे घरात केवळ रविंद्र, त्याची पत्नी उज्वला आणि आई द्वारकाबाई असे तिघेच जण रहात होते. मात्र घरात सासु आणि सुनेचे काही केल्या पटत नव्हते. काही ना काही कारणावरुन दोघात धुसफुस सुरुच रहात होती. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधे सासु सुनेचे वाद दाखवले जातात. अशा मालिका सतत बघून देखील अनेक सासु सुनांमधे वादाची मानसिकता निर्माण झालेली असते. पुर्वीच्या काळी ललिता पवार नावाची महिला कलाकार मोठ्या पडद्यावरील सासुची भुमिका पार पाडण्यात कुविख्यात होती. त्याकाळी खाष्ट सासू म्हटली म्हणजे ललिता पवार या कलाकाराचे नाव नजरेसमोर येत होते. तशा प्रकारची उज्वलाची सासू द्वारकाबाई निश्चितच खाष्ट नव्हती. परंतु दोघांचे काही केल्या पटत नव्हते. त्यातच उज्वला एक मनोरुग्ण असल्याचे म्हटले जात होते. पहिले मुल जन्माच्या वेळीच वारल्यानंतर तिच्या मनावर परिणाम झाला असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे तिच्यावर गुजरातच्या दवाखान्यात मानसिक वैद्यकीय उपचार सुरु होते असे सांगितले जाते.

मनोरुग्ण म्हटली जाणारी उज्वला सासु द्वारकाबाई समवेत सतत काहीतरी कुरापत काढून चिडचिड करत होती. वयोमानानुसार द्वारकाबाई देखील कमी अधिक प्रमाणात चिडचिड करत होती. बालपण आणि वृद्धापकाळ जवळपास सारखाच असतो. बालपणातील मुले एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजेच असा हट्ट धरतात. तशीच काहीसी अवस्था वृद्धांची असते. अनेक वृद्ध मनासारखे झाले नाही म्हणजे चिडचिड करत असतात. त्यांची मानसिकता समजून घेणे गरजेचे असते. ती मानसिकता सुनेने समजून घेतली म्हणजे त्या वृद्धांच्या मुलांना घरात त्रास होत नाही. अशा प्रसंगात घरातील कर्त्या पुरुषाचा जणू काही सॅंडविच झालेला असतो. आईचे ऐकावे की पत्नीचे ऐकावे असा यक्षप्रश्न पती व मुलगा अशी दुहेरी भुमिका निभावणा-या पुरुषापुढे निर्माण होत असतो. तशीच काहिशी अवस्था रविंद्रची झाली होती. घरात आई द्वारकाबाईचे ऐकले म्हणजे पत्नी उज्वला रुसवा धरुन बसत असे. पत्नीची बाजू धरली म्हणजे आईच्या चेह-याचा फुगा होत असे. त्यामुळे दुहेरी कचाट्यात सापडलेला रविंद्र गुपचुप आपली तंबाखू आणि चुना हातावर मळत बसण्याचे काम करत होता.    

आईची बाजू घेऊन रविंद्र बोलला म्हणजे उज्वला थेट धमकीचे क्षेपनास्त्र त्याच्या दिशेने फेकत असे. ती पती रविंद्रला एकेरी भाषेत मी तुझ्या आईचा मर्डर करुन टाकीन अशी धमकी देत असे. त्याच वेळी कुणी नातेवाईक घरात आला म्हणजे तिच्या मधुर वाणीची जादू ती दाखवत असे. नातेवाईक घरात आले म्हणजे तिच्या वाणीत अमुलाग्र बदल होत असे. नातेवाईकांसमोर ती सासुला अगदी प्रेमाची वागणूक देत असे. नातेवाईकांचे देखील व्यवस्थित आदरतिथ्य करत होती. तिच्या अशा चमत्कारी वागण्याची शंका यावी असे तिचे वर्तन होते. ती खरोखरच मनोरुग्ण होती का? हे नातेवाईकांसह परिसरातील लोकांना समजण्यास मार्ग नव्हता. मात्र तीचे व सासुचे काही पटत नव्हते एवढे मात्र खरे होते. 

2 जून 2021 रोजी सायकांळी साडे सहा वाजेच्या सुमारास उज्वलाने रविंद्र व सासु द्वारकाबाईसाठी चहा तयार केला. सुनेच्या हातून घेतलेला हा चहा द्वारकाबाईसाठी शेवटचा चहा ठरला होता. चहा घेतल्यानंतर रविंद्रला तंबाखू खाण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे घराबाहेर असलेल्या पान टपरीवर गेला. चुनामिश्रीत हातावर मळलेली तंबाखू मुखात टाकल्यानंतर काही वेळाने तो घराकडे  परत येण्यास निघाला. शाळेच्या गेटजवळ पोहोचल्यावर त्याला घरातून त्याच्या आईचा जोरजोरात ओरडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. काही तरी अघटीत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घरात जाऊन पाहिले असता त्याला अतिशय विदारक चित्र दिसून आले. उज्वला त्याची आई द्वारकाबाईवर विळ्याने वार करत होती. विळ्याचे घाव द्वारकाबाईच्या मानेवर बसल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळली होती. आईला जखमी अवस्थेत बघून रविंद्र तिच्याजवळ गेला.

“मला उज्वलाने मारले आहे” एवढेच त्याची आई त्याच्याशी अखेरचे बोलली. दरम्यान उज्वलाने घराचा दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. हातात विळा घेतलेल्या उज्वलाचे रणरागीणी रुप बघून रविंद्र मनातून पार घाबरला होता. ती आपल्यावर देखील हल्ला करेल अशी मनातल्या मनात त्याला भिती वाटू लागली. तो तसाच धावत धावत कॉलनीतील नगरसेवक गिरीष महाजन यांच्याकडे मदतीची  याचना करण्यासाठी गेला. माझ्यासोबत चला….. माझ्यसोबत चला …. माझ्या पत्नीने माझ्या आईचा खून केला आहे असे तो नगरसेवक महाजन यांना सांगू लागला. त्याचा पडलेला चेहरा बघून महाजन त्याच्यासोबत त्याच्या घरी आले. त्यांनी घटनास्थळावरील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी लागलीच भुसावळ शहर पोलिस स्टेशनला फोन करुन या विदारक घटनेची माहिती दिली.

यावेळी पोलिस स्टेशनला सहायक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहू हजर होते. स.पो.नि. संदीप दुनगहू यांनी लागलीच वरिष्ठ असलेले पो.नि.बाबासाहेब ठोंबे यांना घटनेची माहिती कळवत घटनास्थळी धाव घेतली. स.पो.नि. दुनगहू यांनी तातडीने घटनास्थळी योग्य त्या हालचाली सुरु केल्या. काही वेळातच घटनास्थळी पो.नि.बाबासाहेब ठोंबे, स.पो.नि.विनोदकुमार गोसावी व इतर कर्मचारी हजर झाले. घटनास्थळी कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली. सासुवर हल्ला करणा-या सुनेला विळ्यासह ताब्यात घेण्यात आले. 77 वर्ष वयाची द्वारकाबाई केव्हाच देवाघरी गेली होती.

याप्रकरणी रविंद्र पंढरीनाथ सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी उज्वला सोनवणे हिच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविंद्रची पत्नी उज्वला हिस अटक करण्यात आली. सायकांळच्या वेळी पोळ्या तयार करत असतांना उज्वलाचे सासूसोबत घरगुती कारणातून वाद झाले. या वादातून उज्वलाने तिची सासू द्वारकाबाईला विळ्याने जिवे ठार केले होते. 77 वर्ष वय असलेल्या द्वारकाबाईच्या मानेवर, कंबरेवर तसेच पाठ, डोके व उजव्या हाताच्या खाली विळ्याने सपासप वार केल्याने द्वारकाबाई जागीच ठार झाली होती. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक निरीक्षक संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या गुन्ह्याच्या तपास स.पो.नि. विनोदकुमार गोसावी यांचेकडे सोपवण्यात आला. सासूची हत्या करणारी अटकेतील सुन उज्वला हिस स.पो.नि. विनोदकुमार गोसावी यांनी न्यायालयात हजर करत घटना कथन केली. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.बाबासाहेब  ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विनोदकुमार गोसावी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here