रिक्षातील प्रवाशास लुटणा-या दोघांना अटक

On: June 8, 2021 10:01 PM

जळगाव : रिक्षात बसलेल्या प्रवाशाची रिक्षाचालकासह संगनमताने लुट करणा-या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. रिक्षाचालकाचे तिन साथीदार अगोदरच प्रवाशांच्या रुपात रिक्षात बसलेले असतात. त्यात चौथ्या शेअरिंग प्रवाशाला बसवून घेत रस्त्यात त्याची लुट करण्याची पद्धत या घटनेतून पुन्हा एकवेळ समोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरातून दोघांना अटक केली आहे.

जामनेर येथील रहिवासी असलेले अब्दुल कलीम गफुर शेख हे आज जळगाव येथे घरगुती वस्तू खरेदीच्या निमीत्ताने आले होते.  दुपारी एक वाजता शहरातील अजिंठा चौफुलीजवळ उतरल्यावर ते चित्रा चौकात येण्यासाठी एका रिक्षात बसले. त्या रिक्षात अगोदरच तिन प्रवासी बसलेले होते. अगोदरच बसलेल्या साथीदारांच्या मधोमध अब्दुल शेख यांना बसवण्यात आले. वाटेत वैकुंठ धाम नजीक धक्काबुक्की करत त्यांना खाली उतरवून देण्यात आले. दरम्यान रिक्षातील प्रवाशांच्या रुपात बसलेल्या लुटारुंनी त्यांच्या खिशातील 25 हजार रुपयांची रक्कम बळजबरी काढून घेत लुट केली. भेदरलेल्या अब्दुल कलीम यांना रिक्षाचा क्रमांक टिपून घेण्याचे घटनेच्या वेळी सुचले नाही. मात्र लुट करणा-या प्रवाशांच्या शरीरयष्ठीचे आणि रिक्षाचे वर्णन त्यांनी लक्षात ठेवले होते.  या वर्णनाच्या आधारे त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला.

सहायक  फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, मुकेश पाटील, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी आपल्या खब-यांच्या मदतीने शोध घेत गेंदालाल मिल परिसर गाठला. अखेर मोहसीन खान नुरखान व शाहरुख शेख रफीक या दोघा संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. तसेच इतर दोघा साथीदारांची नावे देखील कबुल केली. फरार झालेल्या इतर दोघा आरोपींचा शोध सुरु आहे. अशा स्वरुपाचे रिक्षातील प्रवाशांना लुटमारीचा प्रकार अटकेतील आरोपींनी यापुर्वी केलेले आहेत. अटकेतील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तपासकामी जप्त करण्यात आलीआहे. अटकेतील दोघा आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. लुटीतील दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment