मुंबई : सिनेसृष्टीत संघर्षाची वाटचाल करणा-या अनेक अभिनेत्री व मॉडेलना लॉकडाऊन कालावधीत काम मिळेनासे झाले. नवागत मॉडेल व अभिनेत्रींच्या अशा परिस्थितीचा गैरफायदा काही दिग्दर्शकांनी घेतला असल्याचे विविध घटनांमधून दिसून येत आहे.
वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका मॉडेलची अश्लिल चित्रफित तयार केल्याची घटना उघड झाली आहे. तसेच चित्रीत केलेला व्हिडीओ “जिजा का पिझ्झा” या नावाने सोशल मिडीयावर अपलोड देखील करण्यात आला. दिग्दर्शकासह त्याच्या साथीदारांनी आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याचे समजल्यावर त्या मॉडेलला धक्काच बसला. आपली बदनामी झाल्याचे समजल्यानंतर त्या मॉडेलने मालवणी पोलिस स्टेशन गाठत दिग्दर्शकासह त्याच्या तिघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केली नसून तपास सुरु आहे. या घटनेतील पिडीत मॉडेल तरुणी बॉलीवुडमधे येण्यासाठी प्रयत्नशिल होती. दरम्यान या मॉडेलला वेब सिरीजमधे मुख्य नायिकेचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत दिग्दर्शकाने मालवणी परिसरातील एका बंगल्यात बोलावून घेतले. अडचणीच्या काळात नायिकेची भुमिका मिळत असल्याचे बघून सारासार विचार न करता तिने होकार देत दिग्दर्शकाची भेट घेतली. त्याठिकाणी दिग्दर्शकाचे साथीदार अगोदरच हजर होते. त्याठिकाणी मॉडेलसोबत एक अश्लिल चित्रफीत तयार करण्यात आली. ती चित्रफीत सोशल मिडीयावर “जिजा का पिझ्झा” या नावाने अपलोड करण्यात आली. आपली बदनामी झाल्याचे बघून त्या मॉडेलने मालवणी पोलिस स्टेशनला जात लेखी तक्रार दाखल केली. दिग्दर्शकासह त्याच्या तिघा साथीदारांविरुद्ध रितसर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील मालवणी पोलिसात अशाच स्वरुपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपींविरुद्ध पुरावे संकलीत करण्याचे काम सुरु असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.