जळगाव : मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवलेली 96 हजार रुपयांची रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना आज दुपारी पारोळा शहरात घडली. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा बाजारपेठेतील किल्ला परिसरात सदर घटना घडली आहे.
गोरख वामन पाटील (रा . वाघरे ता .पारोळा) हे दुपारच्या वेळी स्टेट बँकेत 96 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी आले होते. मात्र तेथे गर्दी असल्यामुळे ते पुन्हा माघारी परतले. सोबत असलेली रक्कम त्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. या सर्व घडामोडीवर चोरट्याचे लक्ष होते. डिक्कीत रक्कम ठेवल्यानंतर गोरख पाटील बाजारात खरेदीसाठी निघून गेले. या कालावधीत चोरट्याने संधी साधत काम फत्ते केले. बाजार आटोपून परत आल्यावर आपली रक्कम चोरी झाल्याचे गोरख पाटील यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.