जळगाव : सचिन मगरे हा तरुण वरणगाव येथील आंबेडकर नगरात रहात होता. नगरपरिषदेच्या कचरा संकलन करणा-या गाडीवर तो रोजंदारीने कामाला जात होता. तो रहात असलेल्या आंबेडकर नगरात अजय रविंद्र तायडे, राहुल गजानन कदम व अक्षय संजय भैसे हे तिघे जण देखील रहात होते. सर्व जण एकाच परिसरात व एकाच समाजाचे असल्याने एकमेकांना चांगल्याप्रकारे परिचीत होते. सर्व जण रहात असलेल्या कॉलनीत भोला इंगळे हे देखील राहतात. सहा महिन्यापुर्वी त्यांच्या नातीचा वाढदिवस होता. भोला इंगळे यांनी नातीचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला होता. नातीच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी परिसरातील लोकांना आपल्याकडे बोलावले होते. त्या कार्यक्रमाला सचिन देखील गेला होता.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात गाण्याच्या तालावर सचिनला नाचण्याचा मोह झाला. गाण्याच्या तालावर नाचण्याच्या मोहाला तो आवर घालू शकला नाही. त्याचे असे सार्वजनीक नाचण्याचे वर्तन गल्लीतील रहिवासी असलेल्या अजय रविंद्र तायडे, राहुल गजानन कदम व अक्षय संजय भैसे यांना आवडले नाही. त्यांनी त्याला नाचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनच्या अंगात नाचण्याची जरा जास्तच हौस आली होती. त्यामुळे तिघांनी त्याला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिघांसोबत सचिनचा कमी अधिक प्रमाणात वाद निर्माण झाला. सचिन जणू काही तिघा जणांना डिवचत होता. शब्दामागे शब्द वाढत असतांना तिघांनी मिळून सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद एवढा वाढला की अजय, राहुल व अक्षय या तिघा तरुणांनी मिळून सचिनला जवळच असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात ढकलून दिले. प्रकरण वाढत असल्याचे बघून सचिनचा भाऊ भिमराज तेथे धावत आला.
भिमराजने तिघा तरुणांची विनवणी करत भाऊ सचिन यास सोडून देण्यास सांगितले. भिमराज मगरे याची विनवणी बघून तिघा जणांनी सचिनला मारहाण करण्याकामी लगाम लावला. भिमराजच्या विनवणीमुळे सचिनची त्या दिवशी कशीबशी सुटका झाली. आता झाले गेले विसरुन या तिघांच्या नादी न लागणे यात सचिनचा शहानपणा होता. मात्र तसे झाले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मार बसल्यानंतर देखील सचिनची फळफळ थांबण्यास तयार नव्हती. तिघे जण समोर आले म्हणजे तो त्यांच्याकडे खुनशी नजरेने बघत होता. तो एकप्रकारे तिघांना डिवचत होता. त्यामुळे अजय, राहुल व अक्षय या तिघांच्या अहंभावाला जणू काही आव्हान दिले जात होते. सचिन मगरे याला जास्त माज आला असल्याची भावना तिघा तरुणांच्या मनात घर करुन बसली होती. रस्त्याने जाता येता तो तिघांकडे बघून त्यांना डिवचण्याचे काम काही थांबवत नव्हता. त्यामुळे साहजीकच तरुणाईचा जोश अंगी असलेल्या तिघांचा राग उफाळून येण्यास वेळ लागत नव्हता. सचिन मगरे हा देखील एकदम विशीतील तरुण होता. त्यामुळे त्याच्या अंगी देखील जोश आणि उत्साह ओसंडून वहात होता. कुणीच कुणाचे ऐकून घेण्याच्या व समजून घेण्याच्या तयारीत नव्हता. प्रत्येक जण आपली तारुण्याची रग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात मश्गुल होता. सचिनचा भाऊ भिमराज मात्र तिघांच्या हातापाया पडून आपल्या भावाला समजून घ्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणून वेळोवेळी विनवणी करत होता.
7 जून रोजी साधारण सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात सचिन व तिघा तरुणांची नजरानजर झाली. त्यावेळी सचिनने तिघांकडे बघून त्यांना नेहमीप्रमाणे डिवचले. आज सचिनचा गेम करुनच टाकू असे तिघांनी आपसात त्याचवेळी ठरवले. सर्वांच्याच अंगी तारुण्याचा जोश आणि हुल्लडबाजी होती. तिघांना माहिती होते की सचिन रोज सायंकाळी जिमला जातो. जिममधून घरी जातांना वाटेत दुध घेण्यासाठी थांबतो. दुकानावरुन दुध घेतल्यानंतर तो घरी जातो. हा त्याचा नित्यक्रम तिघांना माहिती होता. 7 जूनच्या रात्री तो जिममधून बाहेर आला. वाटेत नेहमीप्रमाणे त्याने दुध घेतले. त्यानंतर तिघांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने देखील त्याला हेरले. आज ते एकुण चार जण होते. रात्रीचे दहा वाजून गेले होते. रात्रीच्या अंधारातच चौघांनी त्याला रिंगणात घेतले. त्याचवेळी सचिनचा भाऊ भिमराज हा रात्रीचे जेवण आटोपून आंबेडकर पुतळ्याजवळ गॅरेजच्या बाजूला सहज बसला होता. त्यावेळी त्याला सचिनची मोटारसायकल पुतळ्याजवळ दिसली. काही वेळाने त्याला सचिनचा जिवाच्या आकांताने होणारा आक्रोश ऐकू आला. आवाजाच्या दिशेने सचिनचा भाऊ भिमराज धावला. महालक्ष्मी सॉ मील जवळ राहुल गजानन कदम, अजय रविंद्र तायडे, अक्षय संजय भैसे व त्यांच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा असे सर्वजण सचिन मगरे यास शिवीगाळ करुन लाथाबुक्कयानी मारहाण करत होते. त्यावेळी अजय रविंद्र तायडे याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने सचिनच्या पाठीवर, मानेवर वार केले.
धारदार शस्त्राच्या घावात सचिन रक्तबंबाळ होत मोठ्या प्रमाणात जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात सचिन जागेवरच कोसळला. सचिनच्या छातीवर, तोंडावर, पाठीवर व मानेवर एकुण नऊ ठिकाणी वार झाल्यामुळे जागेवर मोठ्या प्रमाणात जणू काही रक्ताचा सडा पडला होता. आपल्या भावाला वाचवण्यासाठी भिमराज याने चौघांची विनवणी सुरु केली. काहीही करुन सचिनला सोडा अशी आर्त विनवणी तो करत होता. काही वेळाने चौघे मारेकरी प्रतिभा नगरच्या दिशेने पळून गेले. दरम्यान भिमराजच्या शेजारी राहणारा संतोष इंगळे तेथे धावत आला. त्याच्या मदतीने सचिन यास दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी सचिन यास मयत घोषित केले. सचिन मयत झाल्याचे समजताच भिमराज धाय मोकलून रडू लागला.
या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक संदिपकुमार बोरसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी व दवाखान्यात हजर झाले. घटनेची माहिती समजून घेत स.पो.नि. संदिपकुमार बोरसे यांनी तात्काळ मारेक-यांच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. याप्रकरणी 8 जूनच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास भिमराज मगरे याच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 115/21 भा.द.वि. 302, 323, 504, 25(4) , 34 नुसार अजय रविंद्र तायडे, राहुल गजानन कदम, अक्षय संजय भैसे व त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाविरुद्ध दाखल करण्यात आला. स.पो.नि. संदिपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चौघा हल्लेखोरांना सकाळपर्यंत ताब्यात घेत अटक करण्यात आली. मंगळवार 8 जून रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. या घटनेनंतर अटकेतील तरुणांच्या मनावर जणूकाही निर्ढावल्यासारखे हावभाव दिसून येत होते. या घटनेचा तपास स.पो.नि. संदिपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.