जळगाव : दोन खून करुन गेल्या काही वर्षापासून फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. एका घटनेत या फरार आरोपीने त्याच्या पत्नीचाच खून केला आहे. कल्लुसिंग शंकरसिंग राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन खून केल्याप्रकरणी कल्लुसिंग याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
मेहरुण परिसरातील रहिवासी असलेल्या कल्लुसिंग शंकरसिंग राजपूत व त्याचा भाऊ जितेंद्र राजपूत या दोघांनी सुरेश बंजारा या युवकाला 6 फेब्रुवारी 2011 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मारहाण केली होती. या मारहाणीमागे एका महिलेचा वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी आसाराम छोटीलाल पवार यांनी मध्यस्ती केली होती. मध्यस्ती करणा-या आसाराम पवार यांना कल्लुसिंग राजपूत याने चाकूने बरगडीत मारुन दुखापत केली होती. या घटनेत आसाराम पवार मयत झाले होते. याप्रकरणी कल्लुसिंग याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर दुस-या घटनेत सन 2015 मधे पत्नीला मुलबाळ होत नाही या कारणावरुन कल्ल्लुसिंग राजपूत याने त्याच्या पत्नीला रॉकेल टाकुन पेटवून दिले होते. याप्रकरणी देखील कल्लुसिंग याच्यावर एमआयडीसी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल आहे. खूनाचे दोन गुन्हे दाखल असलेला कल्लुसिंग राजपूत फरार होता. त्यांच्या विरुध्द पकड वॉरन्ट काढण्यात आले होते. त्याच्या शोधार्थ तपास पथक त्याच्या मुळ गावी उत्तर प्रदेशात दोन वेळा जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. न्यायालयाने वेळोवेळी त्याचे स्टॅंडिंग वारंट देखील काढले होते. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, असीम तडवी, चेतन सोनवणे, सचिन पाटील, सतिष गर्जे आदींच्या पथकाने त्याला एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सदर आरोपी बाबत वारंट असल्याबाबतची माहिती पोलिस अंमलदार विनोद बोरसे यांनी दिली आहे.