करोडो रुपयांची ऑनलाईन फसवणूक – आरोपीस अटक

जळगाव : वेगवेगळी नावे सांगून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने पैसे दुपटीचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीतील एकाला जळगाव सायबर शाखेने अटक करण्यात यश मिळवले आहे. विकास कपुर पिता सुरिंदर कपुर असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.

बळीराम हिरे (पोलिस निरीक्षक) – अंगद नेमाने (पोलिस उप निरीक्षक) – दिलीप चिंचोले (पोलिस नाईक)

वामन काशिराम महाजन (रा.अंतुली, ता.मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव) यांना सन 2014 ते 22 फेब्रुवारी 2019 दरम्यान पंकज कुमार, हरबंसलाल, कविता, समीर मेहरा, शुक्ला, एस.पी.सिन्हा, रिया, मेहता अशी वेगवेगळी नावे सांगून त्यांच्या मोबाईलवर कॉल आले होते. या नावाने आलेल्या कॉलच्या माध्यमातून पलीकडून मोबाईलवर बोलणारे आपली ओळख लपवत होते. एसबीआय लाईफ इन्शुरन्स पॉलीसीला एजंट कोड व म्युच्युअल फंडच्या माध्यमातुन रक्कम दुप्पट होतील असे भासवत पलीकडून बोलणा-यांनी वामन महाजन यांना वेळोवेळी फंड रिलीफ करण्यासाठी वेळोवेळी तब्बल 35 बॅंकच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते. वेळोवेळी आरटीजीएस व एनईएफटीच्या माध्यमातून वामन महाजन यांनी भरलेली रक्कम 1 कोटी 73 लाख 89 हजार 945 रुपये एवढी होती. ती पलीकडून बोलणा-यांनी ऑनलाईन स्विकारली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वामन महाजन यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.नं.63/2020 भा.द.वि. 420, 465, 467, 468, 471, 34 120 (ब) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (डी) नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला. या गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषन सायबर पोलीस स्टेशनचे पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अंगत नेमाने, पो. ना. दिलीप चिंचोले, पो.कॉ. गौरव पाटील, पो.कॉ. दिपक सोनवणे, पो.कॉ. अरविंद वानखेडे यांनी पुर्ण केले.

या गुन्ह्यातील आरोपी विकास कपूर व त्याच्या साथीदारांनी बनावट नावाने घेतलेल्या मोबाईल सिमकार्डचा वापर करत फिर्यादी वामन महाजन यांची फसवणूक केली आहे. सायबर पथकाने तपासकामी 10 जून 2021 रोजी दिल्ली, गाझीयाबाद, नोएडा, पालम व्हिलेज येथे जाऊन वेळोवेळी मुक्काम करत सापळा रचला. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास कपूर तिन दिवसांच्या मुक्कामानंतर सायबर पथकाला गवसला. त्याला दिल्ली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची स्थानिक न्यायालयातून ट्रांझीट रिमांड घेण्यात आली. सायबर पथक त्याला घेऊन 15 जून रोजी जळगावला दाखल झाली. त्याला मुक्ताईनगर न्यायालयात हजर करण्यात आले. मुक्ताईनगर न्यायालयाने त्याला 25 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here