जळगाव जिल्ह्यातील गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या मल्टीस्टेट पतपेढीवर सीबीआय छापेमारीसह हायप्रोफाईल उद्योजक भागवत भंगाळेंसह डझनभरांची धरपकड झाली. या घटनेमुळे खळबळ माजणे स्वाभाविक आहे. या कथित मल्टीस्टेट पतसंस्थेतुन काही नामचिन राजकारणी – त्यांचे काही हस्तक, काही आजी – माजी मंत्र्यांचे कृपापात्र कार्यकर्ते यांच्यावरील कारवाई सत्राने खळबळ तर उडालीच शिवाय पुन्हा एकदा खडसे – गिरिश महाजन वादाला तोंड फुटले आहे.
साधारणत: 1990 पासून महाराष्ट्रात पतपेढ्यांची गावगन्ना दुकानदारी चालवरांनी धुमाकुळ घातला. त्यात जळगाव जिल्ह्यातील काही महाभागांनी जिल्ह्याजिल्ह्यांसह राज्यभर शाखा काढण्याचा तर काहींनी राज्याबाहेर “मल्टीस्टेट” दर्जा मिळवण्यासह महाराष्ट्राच्या सहकार कायदा – सहकार रजिस्ट्रार यांची बंधने झुगारण्याचा धुमाकुळ घातला. बॅंकींग रेग्युलेशन अॅक्ट द्वारा चालवले जाणारे बॅंकींग क्षेत्र रिझर्व बॅंकेच्या नियंत्रणात असल्याने तिच्या जाचक नियमावलीपेक्षा पतपेढ्यांमधून ठेवीदारांच्या जमापुंजीची गुंतवणूक फस्त करण्यासाठी वाट्टेल तसा धुमाकुळ घालण्यात आला. जनक्षोभ उसळताच सन 2003 नंतर अनेकांचे काळे धंदे बाहेर आले.
भुदरगडच्या पतपेढी चालकाने डोक्यात पिस्तुलने गोळी घालून आत्मह्त्या केली. राज्यभर शाखा असल्याचा टेंभा मिरवणा-या पतपेढीच्या एका मॅनेजरने पुण्यात आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या पतपेढीच्या पुणे शाखेत ही भिषण घटना घडल्याने संचालक मंडळावर खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी झाली. जळगाव जिल्ह्यात राज्यभर शाखा काढण्याची परस्परांसोबत स्पर्धा करण्यात दोन पतपेढ्या सुमारे हजार – बाराशे कोटींच्या ठेवी जमवल्याच्या बाता मारत असतांनाच जामनेर तालुक्यातून उगम पावलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात “बीएचआर” मल्टीस्टेट पतपेढीने त्या दोघांना मागे टाकले.
मल्टीस्टेटचा दर्जा केंद्रीय रजिस्ट्रार मिळवून महाराष्ट्राचे सहकारी नियंत्रण खिशात घातले. वाट्टेल त्या नावाने ठेवी स्विकारुन कोट्यावधीच्या काळ्या पैशाला आश्रय दिला. बीएचआर च्या पुण्यातील घोले पाटील रोड शाखेत 1600 कोटींचा बेनामी काळा पैसा जमवण्याचा उद्योग एका तक्रारीनंतर बाहेर आला. त्यानंतर या संस्था चालकांवर राज्यभरात सुमारे 75 ते 100 गुन्हे नोंदवले गेले. या संस्थेतून कोट्यावधीचे कर्ज घेतल्याचे देखावे करुन काही जणांनी सोन्या चांदीची खरेदी विक्रीची दुकाने टाकली. काहींनी ठेकेदारीची दुकाने मांडली. ही संस्था मनीलॉंड्रींगला हातभार लावते. अशा प्रकारचा आरोप आहे. बीएचआर प्रकरणात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे डावे – उजवे हात समजले जाणारे सुनिल झंवर, ठेकेदारीत धुमाकुळ घालणारी जामनेर गॅंग म्हणून ओळख मिरवणरी काही मंडळी आता पुणे पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडली असे धरपकड झालेल्यांच्या नावावरुन दिसते. त्याला खडसे – महाजन वादाची किनार आहे.
जळगाव भाजपा आमदार सुरेश भोळे यांचे जवळचे नातेवाईक भागवत भंगाळे यांच्यावर कारवाई झाल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे कुणासाठी जळगाव मतदारसंघ मोकळा करु पाहतात त्याची चर्चा सुरु झाली आहे. नाही तरी “भंग़ाळे हॉटेलींग – लिकर – गोल्ड” इंडस्ट्रीजमधील कोट्यावधीच्या कथित उलाढालीवर अनेकांची मेहरनजर होतीच. “भंगाळे गृप ऑफ इंडस्ट्रीज” मधे लकीमॅन म्हणून भागवत भंगाळे ओळखले जातात. त्यांच्या निरागसपणात अनेकांना राजकीय स्पर्धक दिसू लागल्याचे म्हणतात. याच दृष्टीकोनातून सुमारे पंधरा वर्षापुर्वी त्यांच्यावर “सुपारी हल्ला” प्रयोग करुन त्यांच्या परिवारास “चुप” बसण्याचा संदेश देण्यात आला होता. बीएचआर प्रकरणात भागवत भंगाळे य आंचा नेमका “रोल” तो काय? ते पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. काही आजी माजी मंत्री, आमदार – खासदार यांची लेटरहेड ज्यांच्याकडे आढळली त्यांना आजवर कोण संरक्षण देत आहे? याचीही चर्चा आहे. शिवाय पोलिस व महसुल प्रशासनाने आयोजीत केलेल्या संगीत रजनी व खान्देश महोत्सव या कार्यक्रमांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आलेल्या मंडळींनी किती देणग्या दिल्या आहेत याचा देखील शोध घेतला जावा असे म्हटले जात आहे.