जळगाव : रोख रक्कम व दागिने असा एकुण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना काल दुपारी मेहरुण परिसरात उघडकीस आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेख सद्दाम अब्दुल वहाब हे मेहरुण परिसरात फेब्रिकेशनचे काम करतात. भाड्याच्या घरात त्यांचे परिवारासह वास्तव्य आहे. त्यांच्या घराजवळच त्यांचे सासरे देखील राहतात. सास-यांची बहिण त्यांच्याकडे गेल्या एक महिन्यापासून राहण्यास आली आहे. शेख सद्दाम यांच्याकडे गोदरेजचे लोखंडी कपाट आहे. सास-यांच्या बहिणीने तिचे दागिने व रोख रकमेची पिशवी शेख सद्दाम यांना त्यांच्या गोदरेजच्या कपाटात ठेवण्यास दिली होती. गोदरेजच्या कपाटात पिशवी सुरक्षीत राहील हा त्यामागचा हेतू होता. 17 जून रोजी दुपारी शेख सद्दाम सिलेंडर घेण्यासाठी गावात आले होते. पती घरी नसल्याचे बघून शेख सद्दाम यांची पत्नी तिच्या वडीलांकडे गप्पा गोष्टी करण्यास निघून गेली. दुपार झाली तरी त्यांची पत्नी वडिलांकडेच होती. शेख सद्दाम हे देखील दुपारपर्यंत घरी नव्हते.
दुपारी साडे चार वाजता शेख सद्दाम घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पत्नी व सासरे यांना कळवली. सर्वांनी घरी आल्यावर पाहणी केली असता घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेली पिशवी देखील गायब झालेली होती. त्या पिशवीतील तिस हजार रुपये रोख, 12 हजार रुपयांच्या कानातील रिंग व 10 हजार रुपये किमतीचा गळ्यातील पांचाली हार असा एकुण 52 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.