पुणे : तातडीच्या रजा कालावधीत कैद्याने पोलिसांच्या कस्टडीतून पलायन केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे येथील कैदी पार्टीच्या पीएसआयसह पाच पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. खात्यांतर्गत झालेल्या प्राथमिक चौकशीअंती पाचही जण दोषी आढळून आले. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळु रामचंद्र मुरकुटे, शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, किशोर चंद्रकांत नेवसे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. वेदप्रकाशसिंग विरेंन्द्रकुमार सिंग (मु.पो. गोलवरा उ.प्र.) असे पलायन करणा-या कैद्याचे नाव आहे. आरोपी वेदप्रकाशसिंग विरेंद्रकुमार सिंग हा येरवडा कारागृहात एका गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत होता. त्याला मुलीच्या लग्नासाठी त्याच्या मुळगावी जायचे होते. गोलवारा ( जि. सुलतानपुर – उत्तरप्रदेश) येथे सात दिवस जाण्यासाठी त्याची तातडीची रजा मंजुर झाली होती. कैदी पार्टी त्याला त्याच्या मुळ गावी सोबत घेऊन गेली होती. मुलीच्या लग्न आटोपल्यानंतर 15 मे रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान पोलिसांना चकवा दिला. त्याने त्याच्या राहत्या घराच्या खिडकीच्या लोखंडी गजाचे स्क्रू काढून जाळी कापून पलायन होण्यात सफलता मिळवली. पोलिसांच्या हलगर्जीपणाची दखल घेत पाचही जणांना निलंबीत करण्यात आले आहे.