जळगाव : माहेरी गेलेल्या शिक्षीकेच्या घरातून महागड्या दहा साड्या चोरी करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भोलासिंग जगदीशसिंग बावरी (28) शिकलकर वाडा शिरसोली नाका तांबापुरा जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला 20 जूनच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्याचा अल्पवयीन साथीदार देखील निष्पन्न झाला आहे. अटकेतील भोलासिंग बावरी याच्याविरुद्ध जळगाव जिल्हापेठ, रामानंद नगर व एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत.
वृंदा गणपतराव गरुड या शिक्षीका असून त्यांचे निवासस्थान पाचोरा रस्त्यावरील जिवनमोती कॉलनीत आहे. साड्यांची चोरी झाली त्या कालावधीत शिक्षीका वृंदा गरुड यांचे पती पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. वृंदा गरुड या त्यांच्या माहेरी धुळे येथे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी घराच्या चाव्या वृंदा गरुड यांच्याकडेच होत्या. एक महिन्यापासून बंद असलेल्या गरुड यांच्या घरात भोलासिंग व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने कडीकोंडा तोडून प्रवेश मिळवला होता. घरातून त्यांनी दोन ते चार हजार रुपये किमतीच्या विविध महागड्या साड्या चोरुन नेल्या होत्या. या दहा साड्यांची किंमत 25 हजार 300 रुपये एवढी होती.
घराचा दरवाजा उघडा असल्याचे वृंदा गरुड यांच्या पुतण्याच्या लक्षात आली होती. त्याने याबाबची माहिती फोनद्वारे त्याच्या काकू वृंदा यांना दिली होती. धुळे येथून परत आल्यावर या घटनेप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीची रितसर तक्रार दाखल केली. गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून चोरटा भोलासिंग बावरी हा फरार होता. तो त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. त्यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, चेतन सोनवणे, सुधीर साळवे, सचिन पाटील यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत अटक केली. भोलसिंग याचा भाऊ मोनू सिंग हा देखील गुन्हेगारी वृत्तीचा असून प्राणघातक हल्ल्याच्या एका गुन्ह्यात तो कारागृहात आहे. भोलासिंग याचा अजून एक भाऊ मोहनसिंग बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. बावरी परिवाराची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. भोलासिंग यास न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सरकारतर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.