जळगाव : जैन इरिगेशनतर्फे सुरु असलेल्या ‘स्नेहाची शिदोरी’ चा उपक्रम लॉकडाऊन काळात गरजूंचा आधार ठरला आहे. ६ जुलै पर्यंतच्या उपक्रमांतर्गत ६ लाख ७ हजार गरजूंना अन्न पाकीटे पोहचवण्यात आली आहे. ३१ मे नंतर कित्येक अन्नछत्र बंद झाले आहे. असे असतानाही शहरातील गरजूंसाठी हा उपक्रम अद्याप सुरूच आहे. जळगाव शहरात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आहे. गरजूंची संख्या लक्षात घेता रोज सकाळी २४०० व सायंकाळी ६०० अन्न पाकिटे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करून दिली जात आहे.
नविन बसस्थानक नजीक कांताई सभागृह येथे सकाळी ११ ते १ दरम्यान अन्न पाकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत. गरजूंनी प्रत्यक्ष येऊन अन्न पाकिटे घ्यावीत. देशात दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. सर्वच क्षेत्रात लॉकडाऊन व कामबंदची स्थिती उद्भवली आहे. याचा परिणाम म्हणून विविध घटकांतील लोकांच्या दोन वेळच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे.
अशा कठिण काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने स्वतःचे आद्यकर्तव्य समजून विविध प्रकारच्या सामाजिक भूमिका व जबाबदा-या निभावल्या आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिलपासून शहरातील गरजुंसाठी दोन वेळच्या अन्न पाकिटांची उपलब्धता करुन देण्याची सेवा सुरूच केली.