पुणे : पुणे पोलिसांच्या डीबी पथकावर सुमारे दिडशे लोकांच्या जमावाने जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघे पोलिस कर्मचारी जबर जखमी झाले आहेत. यासह पोलिसांना माहिती देणा-या खब-याला देखील जिवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जमावात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पुणे येथील वारजा परिसरातील म्हाडा कॉलनीत हा प्रकार घडला. पोलिस कर्मचारी श्रीकांत दगडे यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार वारजे माळवाडी पोलिस स्टेशनला जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत दगडे हे एलसीबीच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक (1) मधे कार्यरत आहेत. पेट्रोलींग दरम्यान खब-याकडून त्यांना समजले की अभिजीत खंडागळे या गुन्हेगारी व्यक्तीच्या ताब्यात गावठी पिस्टल आहे. तो जबरी चोरीच्या प्रयत्नात असून म्हाडा कॉलनीच्या दुस-या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतो. सदर माहिती दगडे यांनी वरिष्ठांच्या कानावर घालत पुढील कारवाई सुरु केली.
आपला सहकारी व खबरी या दोघांना सोबत घेत त्यांनी म्हाडा कॉलनीतील इमारत गाठली. अभिजीत याच्या घराचे दार वाजवले असता आतून एक महिला बाहेर आली. त्या महिलेस अभिजीत बाबत विचारपूस करण्यात आली. अभिजीत बाहेर गेला असल्याचे ती महिला सांगत असतांनाच कॉलनीत मोठ्या प्रमाणात जमाव जमला. खबरीकडे बघत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांबू, विटा, सिमेंटचे ब्लॉक यांचा वापर करत पोलिस व खबरी यांना जमावाने मारहाण करण्यास सुरुवात केली. कुणी कुणाचे ऐकत नव्हता. खब-याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलिसांसह खबरीला देखील बेदम मारहाण झाली. या घटनेप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस स्टेशनला जमावाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची प्रक्रीया व तपास सुरु आहे.