सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नातील चौघे अटकेत

काल्पनिक छायाचित्र

नागपूर : कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान सावधगिरी बाळगल्याने भीषण हत्येचा गुन्हा थोडक्यात टळला. २४ तासानंतर आज दुपारी या घटनेतील चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

निखिल ऊर्फ गोलू लालसिंग मलिये (३०) असे गुन्हेगार टोळीच्या तावडीतून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची नावे गणेश सुधाकर मेश्राम (रा. जयताळा), मनोज वैद्य, अजिंक्य दिनकर नवरे (रा. एकात्मता नगर) आणि भु-या ऊर्फ दिलीप भालचंद्र गाते अशी आहेत. त्यांना पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले.

हल्ल्यातून बचावलेला गोलू मलिये हा भांगे विहारमध्ये राहतो. गेल्या वर्षी शेरा नामक गुंडाची हत्या झाली होती, त्यात गोलूला अटक झाली होती. कारागृहातून बाहेर आलेला गोलू सध्या व्यवसाय करतो. शेराची हत्या करणा-या आरोपींचा खात्मा करुन आपली दहशत माजवण्याचा गणेश मेश्राम याने कट रचला होता. त्यात त्याने सात ते आठ साथीदार सहभागी केले होते.

पुर्वनियोजीत कटानुसार त्याने गोलूकडे आरोपी अजिंक्य नवरे याला कामावर लावले होते. रोज सकाळी येऊन अजिंक्य गोलूची कार धुवायचा. त्यामुळे अजिंक्यवर गोलूचा विश्वास बसला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी अजिंक्य हा गोलूकडे कार धुण्यासाठी आला. गोलू कारजवळ येताच अजिंक्यने त्याच्या डोळ्यात तिखट फेकले. धोका लक्षात येताच गोलू कारमध्ये बसला.

दरम्यान आरोपी गणेश मेश्राम आणि त्याचे साथीदार गोलूजवळ धावत आले. सर्वांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी कारची काच फोडून गोलू यास बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला. गोलूने ओरड करताच त्याचे मित्र मदतीला धावून आले. त्यांनी आरोपींच्या दिशेने दगडफेक सुरु केली. एकाच्या डोक्याला दगड बसल्यामुळे मारेकरी घाबरले. त्यांनी तेथून पळ काढला.

प्रतापनगर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी गुन्हेगारांच्या शोधार्थ पथके रवाना केली होती. आज चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. गोलूकडे कार धुण्याचे काम करणा-या अजिंक्य नवरे यास याने आपला गुन्हा कबुल करतांना इतर साथीदारांची नावे सांगितली. त्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here