जळगाव : गेल्या बारा वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. बंडू रमेश देशमुख रामवाडी चाळीसगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चाळीसगाव पोलिस स्टेशनला सन 1998 मधे गु.र.न. 155/98 भा.द.वि. 376, 34 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयात आरोपी बंडू रमेश देशमुख यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपिल दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपिठाचा निकाल कायम ठेवला होता.सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेचा निकाल दिल्यापासून बंडू देशमुख फरार होता. तो पोलिसांना हवा होता. त्याच्या शोधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने आदेश पारित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, स.फौ.अशोक महाजन, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, भारत पाटील, वसंत लिगायत यांचे पथक त्याच्या शोधार्थ कार्यरत होते. या पथकाने पुणे, नांदगाव, मुंबई या ठिकाणी त्याचा शोध घेतला. अखेर तो चाळीसगाव येथील हिरापुर रोड येथे असल्याची माहिती पो.नि.बकाले यांना समजली. सदर पथकाने चाळीसगाव शहरातील हिरापुर रस्त्यावर सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला जळगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुढील शिक्षेकामी कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले.
.