नगर : गुन्ह्याच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे दागिने पोलिस कर्मचा-याने फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नगरच्या कॅंप पोलिस स्टेशनला गणेश शिंदे या पोलिस कर्मचा-यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गहाण ठेवलेल्या या सोन्याच्या मोबदल्यात या कर्मचा-याने 5 लाख 40 हजार 640 रुपयांची उचल केली आहे.
या घटनेप्रकरणी स.पो.नि.राजेंद्र सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या कारवाई दरम्यान सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर हा मुद्देमाल संबंधित कारकुनाकडे जमा केल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जातो. मात्र गणेश शिंदे याने त्याच्या फायद्यासाठी हा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवत लाखो रुपयांची उचल केली. पो.नि. शशीकुमार देशमुख यांच्या निर्देशाखाली पुढील तपास सुरु आहे.