चेन्नई : तामिळनाडूमधे स्टेट बँकेची बनावट शाखा उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात ही बनावट शाखा उघडण्यात आली. स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या पुत्राने हा धक्कादायक प्रकार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या ख-या अधिका-यांनी ही बनावट बॅंक शाखा बघून आश्चर्याने डोक्याला हात लावून घेतला. एसबीआयच्या शाखेप्रमाणे हुबेहुब कार्यपद्धती या शाखेत होती. या शाखेची बनावट वेब साईट देखील या तरुणाने केली होती.
एसबीआयचे माजी कर्मचारी असलेल्या कमल बाबू याने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी त्याच्यासमवेत त्याचा सहकारी मणीकम व अजून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात भा.द.वि. 473, 469, 484 व 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील कमलचे वडील हे बँक कर्मचारी होते. त्यावेळी कमलचे बँकेत नेहमी येणेजाणे सुरु असायचे. त्याला बँकेची कार्यपद्धती माहिती झाली होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई देखील सेवानिवृत्त झाली होती. त्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यात विलंब लागत होता. त्यामुळे त्याच्या मनात कुविचार आला. पुढील तपास सुरु आहे.