लग्न जमवून देण्याच्या नावाखाली नवरदेवाची फसवणूक

जळगाव : पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील उपवर तरुणाची एका मध्यस्थ कथित महाराजाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश्वर नारायण पाटील हा जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजरांचे या गावातील रहिवासी असून तो मुला मुलींचे लग्न जमवून देण्याचे काम करतो. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील उपवर तरुण रविंद्र प्रकाश पाटील याच्या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर राजेश्वर पाटील याने एका तरुणीचा फोटो पाठवला. तुला ही मुलगी आवडल्यास मी तुझे लग्न या मुलीसोबत लावून देतो असे राजेश्वर पाटील याने उपवर रविंद्र पाटील यास म्हटले.

मुलगी आवडल्यामुळे व राजेश्वर पाटील याच्या बोलण्यावर विश्वास बसल्यामुळे ठरल्यानुसार रविंद्र पाटील याने राजेश्वर पाटील यास दिड लाख रुपये दिले. मुलगी न बघताच व्हाटस अ‍ॅपवर पाठवलेल्या तरुणीसोबत 22 जून रोजी लग्नाचे आयोजन करण्यात आले. नवरी मुलगी राजेश्वर पाटील घेऊन येणार असल्याचे ठरल्यामुळे इकडे नवरदेवाच्या रुपातील रविंद्र्च्या अंगाला हळद लावण्यात आली होती. मात्र नंतर लग्न जमवणा-या मध्यस्त राजेश्वर पाटील याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवला. इकडे लग्नासाठी आलेली मंडळी नववधूची वाट बघत दमले. शेवटी आपली फसवणूक झाली असल्याचे नवरदेवाच्या रुपातील रविंद्र पाटील याच्यासह सर्व व-हाडींच्या लक्षात आले.

राजेश्वर नारायण पाटील याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेश्वर हा फेसबुकवरुन मुलींचे फोटो डाऊनलोड करुन फसवणूक करत असल्याचे तपासात उघड होत आहे. 4 जुलै रोजी दुपारी राजेश्वर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here