जळगाव शहर महानगरपालिकेच्या गाजलेल्या निवडणुकीत भाजपचे मॅजिक मॅन समजले जाणारे गिरीश महाजन यांनी नेमके खडसे समर्थक पाडून 57 नगरसेवकांची टीम निवडून आणली. त्याचा मोठा गाजावाजा जळगावकरांनी पाहिला. मनपा वाटचालीचा हा पहिला अंक भाजपा आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सौ सीमा भोळे यांना महापौर पद बहाल करून झाले. त्यानंतर वजनदार नगरसेवक म्हटले जाणारे कैलास आप्पा सोनवणे यांच्या पत्नी सौ. भारती ताई सोनवणे यांना महापौरपदाची सन्मानाची खुर्ची बहाल करण्यात आली. लागलीच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या काही तरुण नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा गेम वाजवण्यात आला. मिळालेल्या राजकीय सत्तेतून नवी धनसंपदा गाठण्याच्या स्वप्ना सोबत राजकीय अनुयायी प्रमाणापेक्षा जास्त उंची गाठू नये म्हणून हे सारे घडल्याचे चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. एवढा टप्पा गाठेपर्यंत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची खान्देश विकास आघाडी शिवसेनेची सत्ता भाजपने खेचून आणली. शिवाय नाथाभाऊंच्या राजकारणाला शह दिल्याचे सांगून झाले.
दुसरा एपिसोड :- आता मनपाच्या महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी एकनाथराव खडसे यांची भेट घेतली आहे. या भेटीने जिल्ह्याच्या नेतृत्व फळीत नाथाभाऊंचे महत्व वाढल्याचे सांगितले जात आहे. यात सत्य किती? आणि भ्रम किती? यासाठी काही घटनांचा आणि वास्तवाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिक प्रिंट मीडियातून प्लॅंटेड पेड न्यूज द्वारा जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दर्प येतो. यासाठी भ्रम आणि वास्तव समजणे महत्त्वाचे आहे.
भ्रम आणि वास्तव : – 1)एकनाथराव खडसे जिल्ह्याचे मोठे नेते आहेत. यात कुणाचे दुमत नाही. 2) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सरकारमध्ये मोठे वजन आहे. 3) खडसे – जैन यांचे वैर राज्यभरात प्रसिद्ध आहे. 4) त्यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. हे चार मुद्दे भ्रम की वास्तव? याची कसोटी लावा. एकनाथराव खडसे माजी मंत्री आहेत. त्यांना इतर सर्वच नेते जिल्ह्याचे मोठे नेते आज मानतात काय? नाथाभाऊ आणि सुरेशदादा यांनी प्रसंग – लाभ – हानी बघून केलेली दोस्ती – दुश्मनी जळगावकरांना परिचित आहे. तसेच गिरीशभाऊ – नाथाभाऊंचे म्हणता येईल. गिरीश भाऊंच्या जलसंपदाची आजवर चिरफाड का झाली नाही? यांच्या भांडणात उगाच आपला हुकमी एक्का वापरला जातोय हे लक्षात घेऊन एकने जळगावचे पीच सोडून चोपड्यातून आमदारकी गाठली. महाजन यांना अडचणीत आणण्यासाठी खडसे हे सेनेला मदत करतील हा असाच युक्तिवाद पुढे केला जातो. बीएचचार प्रकरणात झंवर यांच्याकडे पडलेल्या पोलीस धाडीत कुणा कुणा माजी मंत्री, आमदार-खासदार असलेल्यांची किती लेटरहेड सापडली? त्यावर कोण काय बोलणार? महाराष्ट्राच्या राजकारणात असे बोलले जाते की एखाद्याच्या बदली – भरती नियुक्तीसाठी लोकप्रतिनिधी शिफारस पत्र देताना किमान 2 लाख ते संबंधित आपल्या जिल्ह्यात पदावर येण्यापूर्वीच टक्केवारी ठरवून घेतात म्हणे. हे खरे की खोटे? बहुदा सारे खोटेच म्हणतील. असो.
आता पालक मंत्री गुलाबरावांचे बघूया. सध्या शिवसेनेत त्यांचे मस्त चालले आहे म्हणजे होते. एरंडोल चे शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी उघडपणे त्यांना डावलण्यासह राजकीय खच्चीकरणाचा गुलाबरावांवर आरोप केला. सन 2014 च्या आपल्या पराभवाच्यामागे तेच होते असाही टोला त्यांनी हाणलाय. जिल्ह्याचे केंद्र असलेल्या जळगावची मनपा, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आपल्या हाती असावी हा प्रत्येक राजकीय नेत्याचा हिशेब असतो. मंत्रिपदावर राहिलेल्यांना तसेच वाटते. त्यासाठी राजकीय स्व – पक्षातले स्पर्धक वाढू नये याची खबरदारी स्व- जातीतल्यांचे गरजेनुसार धृवीकरण – खच्चीकरण, पोलिसी चौकशा शुक्लकाष्ट, शुक्लकाष्ठे, स्पर्धकांची माणसे, कार्यकर्ते फोडणे असले उद्योग राज्यात जनतेलाही कळून चुकले आहे.
राजकारणात सत्ता सोपान गाठण्यासाठी जातगंगेकडे धाव घेतली जाते. समाजाचे कार्ड वापरले जाते. स्वतःचा समाज घटक लहान असला तर काहीजण 52 टक्के ओबीसी कार्ड देखील अलीकडे वापरतात. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यात आता खरा आदिवासी – खोटा आदिवासी, खरा ओबीसी – खोटा ओबीसी असे नवे वाद उभे राहिले आहेत. जळगाव मनपा चे पाहिले तर भाजपचे 27 नगरसेवक फोडून शिवसेनेत आणल्याचे प्रकरण सध्या गॅसवर असले तरी या फोडाफोडी साठी प्रत्येकी वीस लाखाची बिदागी देण्याची जोखीम कोणी उचलली? त्याचे काय? काही वर्षापूर्वी सुरेश दादा जैन यांच्याकडे गेलेला नगरसेवकांचा एक गट असाच नाथाभाऊंकडे परत आला होता. पहिला महापौर निवडतांना नाथाभाऊंना सोडून अपक्षाने दादा गटात वजन टाकले होते. शेवटी आजच्या जमान्यात जात – पात, समाज हे घटक सोयीनुसार वापरण्याची साधने झाली आहेत. मतलबाचा व्यवहार तिथे जमेल तिकडे धाव घेणे, उड्या घेणे जळगाव – धुळे – नाशिक – नगर अशा प्रत्येक जिल्ह्यात दिसतो. स्थानिक वर्चस्वासाठी नेते भांडतात – कार्यकर्त्यांना झुंजवतात. कार्यकर्त्यांची धन, मन, मसल पॉवर वापरतात आणि रात्रीतून स्पर्धक किंवा विरोधक दुश्मनासोबत हातमिळवणी करतात. हा प्रकार बघून कार्यकर्तेदेखील आता सावध झाले आहेत. ठेकेदारीत घाऊक रित्या विकले जाण्यापेक्षा स्वतः ठेकेदार म्हणून व्यवहार ठरवू लागले आहेत. त्यामुळे आता भाजप असो की शिवसेना. काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, समाज असो की जातगंगा, व्यवहार ठरवून फायदा मिळवा हाच आजचा मुलमंत्र बनल्याचे दिसते. उगाच कुणी कुणाला दोष देण्यात काय अर्थ?