जळगाव : अमळनेर येथील सार्वजनीक बांधकाम विभाग उप अभियंताच्या सांगण्यानुसार कनिष्ठ अभियंत्याने बांधकाम ठेकेदार कंपनीच्या इंजीनीयरकडे काढलेल्या बिलाच्या बदल्यात मागीतलेली 2 लाख 58 हजार रुपयांची लाच दोघांना महागात पडली आहे. उप अभियंता व कनिष्ठ अभियंता असे दोघे अभियंते धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. उपविभागीय अभियंता (वर्ग 1) दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधीलकर असे लाच प्रकरणात अडकलेल्या दोघा अभियंत्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे धुळे येथील कंस्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनियर म्हणून कामाला आहेत. या कंपनीचा आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे आहे. नंदुरबार येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग,अमळनेर यांचे कडुन आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला आहे. तक्रारदार काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीने या बांधकामाचे काम करारनामा करुन आपल्याकडे घेतले आहे. सदर आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या आतापावेतो झालेल्या बांधकामाचे बिल कंस्ट्रक्शन कंपनीस अदा करण्यात आले आहे. या अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या मोबदल्यात दिनेश पाटील (उपविभागीय अभियंता वर्ग 1) यांनी कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधीलकर यांच्या माध्यमातून तक्रारदाराकडे 2 लाख 58 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत सिद्ध झाले.
त्यानुसार धुळे एसीबीने दोघांविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयाचे कलम 7 व 12 प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतिष भामरे , पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेश मोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांनी या सापळ्यात सहभाग घेतला.