जळगाव : यावल शहराच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफी दुकानात भर दुपारी एक वाजेच्या सुमारास काही लुटारुंनी धुमाकुळ घातला. बंदुकीच्या धाक दाखवत या लुटारुंनी दहशत निर्माण केली. या घटनेने यावल शहर व परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक सराफी दुकानात आलेल्या लुटारुंनी दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या गळ्याला पिस्तुल लावले. जो काही माल असेल तो काढून द्या असे म्हणत त्यांनी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान दुकानाच्या बाहेर नागरिकांनी गोंधळ सुरु केल्यामुळे अज्ञात लुटारुंनी पलायन केले. लुटारुंना विरोध करणा-या एका जणाच्या दिशेने लुटारुने गोळी झाडली. ती गोळी कुणाला लागली नाही मात्र त्या आवाजाने परिसरात दहशत निर्माण झाली. लुटारु पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. त्यांनी नेमका किती माल लुटून नेला? ते कुठले होते? ते कुठे पळाले? याचा शोध पोलिस घेत असून ते लवकरच पकडले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे