धुळे : हरचंद देवा भिल हा दोन्ही डोळ्यांनी अंध तरुण होता. दोन्ही निकामी डोळ्यांपैकी त्याचा एक डोळा किंचीत उघडत असे. त्या किंचीत उघडणा-या व किलकिलणा-या एका डोळ्याच्या पापणीतून तो जग बघत असे. किंचीत उघडणा-या एका पापणीतून त्याची भिरभिरती नजर गावातील तरुणींच्या सौंदर्याचा वेध घेत असे. तो अंध असल्यामुळे कुणी अनोळखी मनुष्य अथवा स्त्री त्याच्या चारित्र्यावर संशय घेत नसे. त्यामुळे अंधपणाचा गैरफायदा घेण्याची संधी देखील तो सोडत नव्हता. धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील अशिक्षीत समाजात हरचंद जन्माला आला होता. अंध हरचंदची बुद्धी इतर डोळस समाजबांधवांच्या तुलनेत थोडी जास्त होती. त्याचा देखील तो गैरफायदा घेत असे. सामाजिक संस्थेच्या कामानिमीत्त तो कधी कधी बाहेरगावी देखील जात असे. त्यामुळे आपण कुणीतरी बडी हस्ती असल्यासारखे त्याला वाटत असे. त्याला कुणी समजावण्यास गेला म्हणजे तो थेट एस.पी. , कलेक्टर यांच्या नावे धमकी देऊन समाजातील इतर अशिक्षीत बांधवांना गप्प करत असे. “वासरात लंगडी गाय शहाणी” या म्हणीप्रमाणे समाजातील अशिक्षीत लोक हरचंद यास मान देऊन गप्प राहण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे तो वेगळ्याच दुनियेत आणि तालात वावरत असे.
हरचंद रहात असलेल्या घरासमोर संजय उत्तम भिल नावाचा तरुण रहात होता. संजय भिल हा उस तोड कामगारांचा पुरवठादार होता. उसतोड कामगारांना उस तोडण्यासाठी गावोगावी शेतात घेऊन जाण्याचे व घेऊन येण्याचे काम तो करत होता. या कामाच्या माध्यमातून तो काही दिवस घराबाहेर मुक्कामी रहात असे. या कालावधीत हरचंदची एका पापणीच्या माध्यमातून किंचीत जग दाखवणारी नजर संजयच्या घरावर खिळून रहात असे. संजयच्या गैरहजेरीत त्याच्या घरात कोण प्रवेश – निर्गमन करतो अथवा करते याची तो किंचीत उघडणा-या एका डोळ्याच्या पापणीतून फुकटची निगराणी करत असे. त्यात त्याला सुख वाटत होते.
संजयचे प्रेम असलेल्या महिलेवर देखील अंध हरचंदच्या एका पापणीची मिनमिनती नजर खिळून रहात होती. तो त्या महिलेसोबत लगट करण्यात धन्यता मानत होता. उन्हाळ्याच्या दिवसात ती महिला घराच्या अंगणात झोपली म्हणजे हरचंद हरखून जात असे. अंधपणाचा फायदा घेत त्या महिलेसोबत लगट करण्याचा तो प्रयत्न करत असे. त्याच्या अशा विविध कारनाम्यांमुळे अनेक जण त्रस्त झाले होते. मात्र तो अंध असल्यामुळे पिडीत व्यक्तीच्या तक्रारीला बेदखल केले जात होते. त्याच्या अंधपणाकडे बघून लोक तक्रारदारालाच खडे बोल सुनावत असे. मात्र अंध हरचंद किती मुजोर आहे हे केवळ पिडीत तक्रारदारालाच समजत असे. पोलिसांकडे कुणी पिडीत पुरुष अथवा महिलेने त्याच्या कारनाम्यांची तक्रार केली म्हणजे त्याचे दोन्ही अंध डोळे बघून त्याला क्लिनचिट दिली जात असे. त्याला क्लिनचिट मिळाली म्हणजे नंतर त्याची मुजोरी वाढत असे.
संजयचे प्रेम असलेल्या महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न हरचंद करत असे. त्या महिलेचे अजुन कुणासोबत प्रेमसंबंध आहेत का? याची देखील हरचंद पडताळणी करत होता. त्यामुळे उसतोडीचे काम आटोपून घरी आलेल्या संजयकडे त्या महिलेने हरचंदची तक्रार केली होती. त्यातून हरचंद व संजय या दोघांचे वाद आणि हाणामारी देखील झाली होती. तरीदेखील हरचंदचे अंधपणाच्या आडून छुपे कारनामे सुरुच होते. त्यामुळे संजय वैतागला होता. त्याला कायमची अद्दल घडवण्याचे संजयने मनाशी ठरवले. याकामी त्याने त्याचा साथीदार ज्ञानेश्वर जगन्नाथ भिल याला सहभागी करुन घेण्याचे ठरवले.
19 जूनच्या रात्री संजय भिल व ज्ञानेश्वर भिल या दोघा मित्रांनी अंध हरचंद यास दारु पिण्याचे आमिष दाखवले. आपण तिघे जण दारु पिण्यासाठी बाहेर जाऊ असे त्याला संजयने म्हटले. दारु पिण्याचे आमंत्रण मिळताच हरचंदची कळी खुलली. तो सायंकाळच्या वेळी दोघांसोबत दुचाकीवर ट्रिपलसिट जाण्यास तयार झाला. संजय व ज्ञानेश्वर या दोघांनी त्याला मोटारसायकलवर ट्रिपलसिट बसवले. तिघे जण सोनगीर येथील हॉटेल मानसी येथे आले. याठिकाणी तिघांनी मनसोक्त मद्यपान केले. मद्यपान केल्यामुळे तिघे जण आपले भान जवळपास विसरले होते. मद्याच्या नशेत असलेल्या हरचंद यास वाटेत तापी नदीच्या पाण्यात फेकून देण्याचे दोघांचे नियोजन होते. मात्र तिघांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. त्यामुळे मद्याच्या अंमलाखाली जात असतांना मोटारसायकल हेलकावे खात धावत होती. त्यामुळे दोघांचा नाईलाज झाला. तापी नदी येण्यापुर्वीच हेलकावे खाणारी मोटारसायकल जागेवरच महामार्गवरील तापी नदीच्या पाईपलाईनजवळ थांबवण्यात आली. तेथे दोघांनी मद्याच्या नशेतील हरचंद यास चांगले ठोकून काढले. तु त्या महिलेसोबत लगट करतो आणि माझी बदनामी देखील करतो असे म्हणत संतापलेल्या संजयने हरचंदवर राग काढण्यास सुरुवात केली.
तापी नदीतून जाणा-या नगरपालिकेच्या पाईपलाईनजवळच असलेल्या मातीत मद्यधुंद हरचंदचा चेहरा संजयने दाबून धरला. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. श्वास गुदमरल्यामुळे काही वेळाने हरचंदने आपला जिव सोडला. हरचंद खरोखर जिवानिशी संपला असल्याची संजय व ज्ञानेश्वर या दोघांनी खात्री करुन घेतली. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह पाईपलाईनच्या आडोशाला लपवत तेथून पलायन केले.
दुस-या दिवशी 20 जून रोजी हरचंदचा मृतदेह परिसरातील नागरिकांच्या नजरेस पडला. या घटनेची खबर नरडाणा पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच नरडाणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. मयत हरचंदचा मृतदेह पोलिसांसह सर्वांसाठी अनोळखी होता. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृतदेहाच्या अंगावर जखमा नसल्यामुळे हा खून नसावा असे गृहीत धरण्यात आले. उत्तरीय तपासणी अहवालात श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण नमुद करण्यात आले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. मयत अंध होता अथवा नव्हता हे देखील कुणाला समजू शकले नव्हते.
मृतदेहाची ओळख पटवण्याकामी मयताचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले. दरम्यान टोल नाक्यावरील एका व्यक्तीने सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोतील तरुणाला ओळखले. मयत हा हरचंद भिल असून तो कापडणे येथील रहिवासी असल्याचे टोल नाक्यावरील त्या कर्मचा-याने पोलिसांना सांगितले. तो कर्मचारी देखील कापडणे येथील रहिवासी होता. अशा प्रकारे मयताची ओळख पटली.
मयताची ओळख पटल्यामुळे त्याच्या भावाला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. मयत हरचंद याच्या भावाने स.पो.नि. मनोज ठाकरे यांना सांगितले की आदल्या दिवशी 19 जून रोजी मयत हरचंद हा गावातील संजय भिल याच्यासोबत त्याच्या मोटारसायकलवर बसून गेला होता. या माहितीच्या आधारे कापडणे गावातील रहिवासी मात्र रजेवरील पोलिस कर्मचा-याला हा प्रकार कळवण्यात आला. त्या कर्मचा-याने देखील तत्परता दाखवत पळून जाण्याच्या बेतात असलेल्या संजय भिल यास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी त्याला ताब्यात घेत चौकशीकामी नरडाणा पोलिस स्टेशनला आणले. त्याला स.पो.नि. मनोज ठाकरे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. त्याने दिलेल्या माहीतीनुसार त्याचा साथीदार ज्ञानेश्वर भिल याचे देखील नाव समोर आले. त्याला देखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. दोघांनी आपला गुन्हा आणि घटनाक्रम कबुल आणि कथन केला. आपले प्रेम असलेल्या महिलेसोबत मयत हरचंद लगट करत असे. तसेच तिची तो बदनामी करत असे. या रागातून संजय भिल याने ज्ञानेश्वर भिल याच्या मदतीने खून केल्याची कबुली पोलिसांना मिळाली.
या घटनेप्रकरणी 21 जून रोजी देवा भिवा भिल यांच्या फिर्यादीनुसार संजय भिल व ज्ञानेश्वर भिल या दोघांविरुद्ध नरडाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 68/21 भा.द.वि. 302, 34 नुसार दाखल करण्यात आला. संजय भिल याचे गावातील एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची मयत हरचंद याने चर्चा केली होती. त्यामुळे संजयची बदनामी झाली. त्यामुळे संजयने ज्ञानेश्वरच्या मदतीने हा खून केल्याबाबतचा आशय मयत हरचंदचे वडील देवा भिवा भिल यांनी फिर्यादीत नमुद केला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली. दोघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नरडाणा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शरद पाटील, पो.उ.नि. घनश्याम मोरे, हे.कॉ. प्रकाश माळी, पोलिस नाईक सचिन वाघ, बागले, पो.कॉ. योगेश पाटील, चालक रामेश्वर सुर्यवंशी, सुशील पाटील आदी करत आहेत.