अमरावती : काम आणि पैशांचे आमिष दाखवत कोलकाता येथून आणलेल्या चौघा बालकांची चाईल्ड लाईन या सामाजीक संस्थेच्या मदतीने सुटका झाली आहे. कोलकाता येथून हावडा – मुंबई या रेल्वेने 14 मुलांचा घोळका बुधवारी 7 जुलै रोजी बडनेरा रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाईन या संस्थेच्या पथकाच्या नजरेस पडला.
मानवी तस्करीचा संशय आल्यामुळे काही बालकांना जवळ बोलावून त्यांची विचारपुस करण्यात आली. काम आणि पैशांचे आमिष दाखवत त्यांना अमरावती येथे आणले गेल्याचे या पथकाला समजले. चाईल्ड लाईनच्या पथकाने यातील चौघा अल्पवयीन बालकांची सुटका करत त्यांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली.
चौदा मुलांपैकी यातील चार अल्पवयीन बालक होती. या चौघा अल्पवयीन बालकांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने व बाल सरंक्षण अधिका-यांच्या आदेशाने बालगृहात दाखल करण्यात आले. या मुलांना अमरावती शहरात कुणी आणले व त्यांना कुठे व काय काम दिले जाणार होते याबाबतचा तपशील पुढे आला नाही.