जळगाव : जळगाव येथील दालमिल व्यापा-यांची फसवणूक केल्या प्रकरणी अजुन दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात निलेश वल्लभभाई सुदाणी (सुरत) यास यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. या फसवणूकीच्या गुन्ह्यातील दाळीचा माल विकणारा व विकत घेणारा अशा दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने सुरत येथून अटक केली आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी या फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील दालमिल व्यापारी सिद्धार्थ नवरतन जैन, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी, दिनेश रामविलास राठी, पुष्पक अरविंद मनियार, अविनाश किशोर कक्कड, किशोरचंद चंचलचंद भंडारी या सहा दाळ व्यापा-यांकडून प्रमुख एंटरप्रायजेस व प्रमुख ट्रेडींग कंपनी सुरत यांनी अनुक्रमे प्रविणभाई व मुकेशभाई अशी नावे सांगून जीएसटी क्रमांक व बॅंक स्टेटमेंट दाखवत विश्वास संपादन करुन विविध प्रकारच्या डाळी मागवल्या होत्या.
यातील रमेशचंद तेजराज जाजू यांच्याकडून 16 लाख 89 हजार 950, सिद्धार्थ नवरतन जैन यांच्याकडून 2 लाख 63 हजार 970, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी यांच्याकडून 2 लाख 37 हजार, दिनेश रामविलास राठी यांच्याकडून 9 लाख 36 हजार 90, पुष्पक अरविंद मणीयार यांच्याकडून 1 लाख 31 हजार 15, अविनाश कक्कड यांच्याकडून 2 लाख 70 हजार व किशोरचंद्र भंडारी यांच्याकडून 10 लाख 38 हजार 863 रुपयांचा असा एकुण 45 लाख 66 हजार 888 रुपयांचा विविध दाळीचा माल मागवण्यात आला होता. माल मिळाल्यानंतर मालाचे पैसे न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा रमेशचंद्र तेजराज जाजू रा. गणपती नगर जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 100/21 भा.द.वि.406, 409, 420, 34 अन्वये दाखल करण्यात आला होता.
या तपासात सर्वप्रथम निलेश वल्लभभाई सुदाणी सुरत यास अटक करण्यात आली होती. इतर फरार आरोपी केतन मिताभाई कपुरिया, अरविंद क्याडा (सुरत), मुकेश देवशीभाई कथोरोटीया , मुकेश देवशीभाई कथोरोटीया सुरत यांचा शोध सुरुच होता.
अटक करण्यात आलेला आरोपी अरविंद क्याडा (रा. सुरत ) हा जळगाव येथील व्यापाऱ्यांशी मोबाईलवर बोलून भाव ठरवत असे. गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून तो फरार होता. पो.नि. शिकारे यांच्या निर्देशाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, राकेश बच्छाव, साईनाथ मुंडे आदींचे पथक सुरत येथे रवाना झाले होते. तेथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक के. एल. सावलिया व जिग्नेश पटेल यांच्या मदतीने आरोपी अरविंद क्याडा यास ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील दाळीचा माल त्याने व्यापारी कौशिक पटेल यांना विक्री केला होता. फसवणूकीच्या गुन्ह्यतील माल विकत घेतल्याप्रकरणी कौशिक पटेल यास देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. सुरत येथून दोघा आरोपीतांना ताब्यात घेत जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले असता त्यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार तर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.