सोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात पो.नि. संपत पवार यांच्या सांगण्यावरुन स.पो.नि. रोहन खंडागळे यांनी साडेसात लाख रुपयांची लाच स्विकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी स.पो.नि. रोहन खंडागळे यांना लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पो.नि. संपत पवार यांना एसीबीने चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर सलगर वस्ती पोलिस स्टेशनला मुरुम चोरीप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले डंपर सोडून देण्यासह आरोपीची अटक टाळण्यासाठी स.पो.नि.रोहन खंडागळे यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र हो….नाही…… काहीतरी कमी करा…… असे करत करत आरोपी साडेसात लाख रुपये देण्यास तयार झाला. त्याला स.पो.नि. रोहन खंडागळे देखील सहमत झाले. हे साडेसात लाख रुपये साडेसातीच्या रुपात स.पो.नि. रोहन खंडागळे यांना त्रासदायक ठरले आहेत.
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरात स.पो.नि. रोहन खंडागळे गेल्यावर त्यांनी साडेसात लाख रुपयांची लाच स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या सापळा रचलेल्या एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सदर रक्कम आपण पो.नि.संपत पवार यांच्या सांगण्यावरुन घेतली होती अशी कबुली स.पो.नि. खंडागळे यांनी दिली आहे. दोघा अधिका-यांविरोधात फौजदार चावडी पोलिस स्टेशनला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर एसीबीचे उपधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पुर्ण करण्यात आली आहे. चार महिन्यांनी पो.नि. संपत पवार सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर होते. मात्र त्यापुर्वीच ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. स.पो.नि. रोहन खंडागळे यापुर्वी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला होते.