राजकीय सत्तेत वाटली जाणारी मंत्रीपदे ही कुणाची जहागिरदारी आहे काय? या प्रश्नाची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. परवाच पंतप्रधान मोदीजी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपील पाटील अशा चार नेत्यांना संधी मिळाली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी चार पैकी तीन मंत्री गेल्या सात वर्षात भाजपात आणले. राज्यातील भाजप नेतृत्वाच्या फडणवीस मंत्रिमंडळातून गच्छंतीचा नारळ मिळालेले एकनाथराव खडसे नेमके पुन्हा ईडीच्या चौकशी फेऱ्यात आल्याच्या मुहूर्तावर राज्यातील चार नेते केंद्रात मंत्रीपदावर बसले.
मोदीजी यांनी केलेल्या नव्या रचनेमुळे खरे तर सुखद धक्का अनुभवायला मिळाला. बहुसंख्य लोकांना हा बदल आवडला – सुखावह वाटला. नेमका त्याच क्षणी खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याचा मुद्दा उकरुन काढून पंकजा मुंडे यांचे ओबीसी नेतृत्व संपवले जात असल्याची पद्धतशीर हाकाटी सुरु झाली. भाजपा हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याबाबत खडसे यांचे मंत्रीपद काढून घेतल्यापासून सांगितले जात आहे. “मी असा कोणता गुन्हा केला ते तरी सांगा” असे म्हणत मंत्रीपद गेल्याबद्दल खडसे यांनी जाब विचारला. आपणच महाराष्ट्रात भाजप वाढवला असे खडसे म्हणत. तर पंकजा मुंडे या देखील भाजप हा तर माझ्या वडिलांचा पक्ष, माझ्या वडिलांनीच भाजप वाढवला असेही त्या म्हणत असत.
पण एक अत्यंत खरी घटना हे सारेच लपवत आहेत. पंकजा मुंडे यांचे पिताश्री गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपातील स्थानाला आव्हान देण्याचे प्रयत्न मागील काळात झाले होते. गोपीनाथ मुंडे यांना न विचारताच महाराष्ट्र भाजपाच्या एका बड्या पदावर गिरीश बापट यांना नेमण्याचा प्रयत्न होताच गोपीनाथजी तेव्हा नॉट-रिचेबल झाले होते. ते त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीतून दिल्लीस धाव घेऊन काँग्रेसवासी होण्यास निघाले होते. त्याची दृश्ये चॅनल्स्वर दाखवली गेली, तशी वृत्ते झळकली. तेव्हा भाजपने एक पाउल मागे घेतले. नॉटरिचेबल गोपीनाथराव काँग्रेस ऐवजी भाजपत पुन्हा प्रकटले. त्यामुळे पंकजा मुंडे म्हणतात तसा भाजप किंवा कोणता एखादा राजकीय पक्ष कुणा एकाच्या मालकीचा होत नाही. आपल्या वडिलांनी वाढलेला पक्ष असल्याचा दावा करुन त्या पक्षातील मंत्रीपदाची जहांगिरी ही आमचीच अशा प्रकारचा दावा फार तर कुणी राजकारणी करु शकतो.
परंतु ही राजकीय सरंजामशाहीची दुकानदारी लोकशाहीत चालत नसते हेच मोदीजी यांनी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपदी नेमून दाखवून दिले आहे. भाजपा आज केंद्रीय सत्तेत आहे. काल भाजप महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीच्या सत्तेत होता. सत्तारुढ राजकीय पक्षात मंत्रीपद मिळवणाऱ्या काही जणांना आमदार खासदारपदी कायम आपली पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे हीच सत्तेवर बसावी असे वाटत असते. आताही गोपीनाथराव कन्या खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद दिले नसल्याचा मुद्दा उकरुन काढत पंकजा मुंडे नाराज असल्याची हवा तापवली जात आहे. देवेंद्र – नरेंद्र फॉर्म्युल्याचा विरोध दर्शवतांना “मी” पणा नसावा असेही सांगीतले जाते. पंकजा मुंडे “मी”पणा वर का भर देत असाव्या? याचीही चर्चा होत आहे. काही राजकीय घराण्यांना सर्व प्रकारच्या बँका, साखर कारखाने, शेत-जमिनी, सहकारी आणि संस्थांची सत्ताकेंद्रे आपल्याच कुटुंबाकडे वारसा हक्काने हवी असतात. पंतप्रधान मोदीजी हे राजकीय घराणेशाही मोडून काढत आहेत हे सुखावह पाऊल समजून त्यांना साथ द्यायला काय हरकत आहे?