मुंबई : गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अदानी उद्योग समूहाकडे मुंबई विमानतळाचा कारभार गेला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान चांगल्याप्रकारे वाढवणे हे आमचे आश्वासन असल्याचे अदानी यांनी म्हटले आहे. या माध्यमातून देशात रोजगार निर्मीती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा दावा गौतम अदानी यांनी केला आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत विमानतळाच्या कारभाराचा निर्णय झाला. मुंबई विमानतळ व्यवस्थापनात अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा राहणार आहे. जीव्हीके समूहाकडील 50.5 टक्के हिस्सा अदानी समूहाने अगोदरच ताब्यात घेतला आहे. अजून 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूहाकडून घेतला जाणार आहे.
देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाकडे आला आहे. लखनऊ, मंगळुरु आणि अहमदाबाद विमानतळानंतर आता मुंबई विमानतळ देखील अदानी समूहाच्या हाती आले आहे. आता जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळे देखील अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताब्यातील सर्व विमानतळे अगामी पन्नास वर्ष अदानी समूहाकडे राहणार आहे. या कालावधीत विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून केले जाणार आहे.