लबाड ट्रकचालक अटकेत

जळगाव : लबाडीच्या इराद्याने गोड बोलून नेलेली ट्रक परत देण्यास टाळाटाळ करणा-या ट्रकचालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. निलेश राजेंद्र परदेशी (रा. मामलदा ता. चोपडा) असे अटकेतील ट्रकचालकाचे नाव आहे.

कैलास सोनू चव्हाण (देव्हारी – धानवड ता.जि. जळगाव) हा ट्रक चालक असून निलेश राजेंद्र परदेशी हा त्याचा मित्र होता. निलेश परदेशी हा देखील ट्रकचालक असून दोघे एकमेकांना परिचीत आहेत. कैलास याने निलेश परदेशी याचेकडून विस हजार रुपये उधार घेतले होते. गेल्यावर्षी लॉकडाऊन कालावधीत निलेश परदेशी हा कैलास याच्याकडे त्याचे विस हजार रुपये परत मागण्यासाठी आला होता. मात्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नंतर देतो असे कैलासने निलेश यास म्हटले होते.

त्यावर उपाय म्हणून निलेशने कैलास यास त्याची मालवाहू ट्रक चालवण्यास मागीतली होती. ट्रक चालवून आलेल्या भाड्यातून विस हजाराची कमाई झाल्यानंतर दोन महिन्यात ट्रक परत करण्याच्या बोलीवर निलेश ट्रक घेऊन गेला होता. विस हजार रुपये परस्पर फिटतील या आशेने व विश्वासाने कैलासने निलेश यास लाखो रुपयांची त्याची मालवाहू ट्रक त्याच्या ताब्यात दिली.

त्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटला. कैलासने निलेशच्या मोबाईलवर ट्रक परत घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र निलेशचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्यामुळे कैलासने निलेशचे तो रहात असलेले चोपडा तालुक्यातील मामलदा गाव गाठले. तेथे तो आणि ट्रक दोघेही नव्हते. नातलगांच्या मदतीने कैलासने ट्रकचा शोध सुरुच ठेवला.

दरम्यान 7 जुलै रोजी सदर ट्रक माल घेऊन नागपूर येथे गेला असल्याची माहिती कैलासला मिळाली. तेथे कैलासने निलेश यास गाठले. तेथे निलेश यास ट्रकची विचारणा केली असता तो म्हणाला की ट्रक जळगावला आहे. त्यामुळे कैलास व त्याचे सोबती पुन्हा जळगावला परत आले. मात्र ट्रक जळगावला नव्हती. त्यामुळे पुन्हा निलेश यास विचारणा करण्यात आली. त्यावेळी ट्रक चोपडा येथे असल्याचे निलेशने सांगितले. पुन्हा सर्व जण चोपडा येथे गेले. मात्र ट्रक चोपडा येथे देखील नव्हती. निलेश आपली फसवणूक करत असल्याचे कैलासच्या लक्षात आले. आपली ट्रक निलेशने कुठेतरी लपवून ठेवली असल्याचे कैलासच्या लक्षात आले. या प्रकरणी कैलास चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै रोजी एमआयडिसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद , सचिन पाटील यांनी त्याचा शोध घेत त्याला त्याच्या गावातून मामलदा ता. चोपडा येथून अटक केली. न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. आरोपी निलेश परदेशी यास तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here