सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून रा.कॉ. कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केली असल्याची घटना सोलापूर नजीक मोहोळ येथे बुधवारी रात्री घडली आहे. मोटार सायकलवर जाणा-या दोघा शिवसैनिकांवर मागच्या बाजुने टेम्पो घालत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत एका शिवसैनिकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध काल रात्री उशीरा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टेम्पोचालकास अटक करण्यात आली आहे..
बुधवारी रात्री उशीरा मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयानजीक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. सतिश क्षीरसागर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव असून विजय सरवदे हा जखमी झाला आहे. राष्ट्रवादीचे पक्षाचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. टेम्पो चालक भैय्या अस्वले हा अटकेत आहे.
काही महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचे म्हटले जात आहे. या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील सेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर व विजय सरवदे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार प्रांताधिकाऱ्यांकडून सुनावणी करण्यात आली होती. या घडामोडीनंतर बोगस नावे कमी झाली होती. या व्यतिरिक्त रमाई आवास योजनेच्या 28 मंजूर गायब फाईलींबाबतही सेनेच्या या कार्यकर्त्यांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपींनी हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक स्वरुपात म्हटले जात आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस स्टेशनमार्फत याप्रकरणी तपास सुरु आहे.