मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मात्र हि जप्त करण्यात आलेली मालमत्ता सन 2004 ते 2015 या कालावधीतील असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या घडीला या जप्त मालमत्तेचे बाजार मुल्य जवळपास 350 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्ता ईडीने काल जप्त केल्या. या मालमत्तांची किंमत 4.20 कोटी रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ही किंमत खरेदीची आहे. आज या मालमत्तांची विक्री किंमत 350 कोटी रुपयांच्या घरात जाते.

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल गुन्ह्याला अनुसरुन ईडीकडून मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना तीन वेळा चौकशीकामी ईडीने हजेरी लावण्यासाठी समन्स बजावले होते. त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला एक वेळा समन्स बजावले. मात्र दोघे पिता पुत्र चौकशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे ईडीला दिली आहेत.
ईडीकडून काल 16 जुलै रोजी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या दोन मालमत्ता जप्त केल्या. त्यात वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला असून त्याचे तत्कालिन खरेदीमुल्य 1 कोटी 54 लाख रुपये एवढे होते. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जमीन देखील ईडीने जप्त केली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांची रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील धुमत या गावी असलेली 8 एकर 30 गुंठे जमीन जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळापासून जवळच मोक्याच्या जागी असलेल्या या जागेची किंमत मोठी आहे. एक कोटी प्रती गुंठा असा भाव येथे सुरु आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या भागीदारीतील प्रीमियर पोर्ट लिंक प्रा.लिमीटेड या कंपनीकडून सन 2004 ते 2015 दरम्यान ही जागा रोखीने घेतली असल्याचे सांगितले जात आहे.








