जळगाव : नोकरीचे प्रलोभन दाखवत तोतयेगिरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अंकित गोवर्धन भालेराव (एस.टी.डेपोमागील बौद्धवाडा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) असे अटकेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. जानेवारी 2020 ते जुलै 2021 या कालावधीत 29 लाख 84 हजार रुपयांच्या अपहारीत रकमेचा हा गुन्हा आहे.
अमोल प्रदीप चौधरी (रा. वसई वेस्ट) या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाने या फसवणूक प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 204/21 भा.द.वि. 420, 419, 417 नुसार फिर्याद दाखल केली आहे. नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी अंकित गोवर्धन भालेराव त्याची बहीण व आई असे तिघे सध्या रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात आहे.
वैभव राणे असे खोटे नाव सांगून अंकित गोवर्धन भालेराव याने अमोल प्रदीप चौधरी यास 4 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय हेमंत सुभाष भंगाळे (हातगाडी चालक) रा. नेहरु नगर मोहाडी रोड जळगाव यांची 4 लाख रुपयात, पुर्वा ललित पोतदार या देहू रोड जिल्हा पुणे येथील गृहीणीची 7 लाख 30 हजार रुपयात, देवेंद्र सुभाष भारंबे (भुसावळ) यांची 2 लाख 40 हजार रुपयात, नितीन प्रभाकर सपके (जळगाव) रा. आनंदनगर मोहाडी रोड या कॉन्ट्रॅक्टरची 12 लाख 60 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकित गोवर्धन भालेराव, त्याची बहिणा स्वाती गोवर्धन भालेराव, त्याची आई रत्नमाला गोवर्धन भालेराव (तिघे रा. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) या तिघांना तोतयेगिरी करुन खोटे नाव सांगून फसवणूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी करण्यात आले आहे. यातील अंकित भालेराव याच्यासह त्याची आई व बहीण यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिपक बिरारी पुढील तपास करत आहेत.