अलिबाग : तात्पुरत्या स्वरुपाच्या कोविड जेलमधून कैद्याने पलायन केल्याची घटना गोंधळपाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पळून गेलेल्या कैद्याच्या शोधार्थ पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
देवा मारुती दगडे (24) असे पळून जाणा-या कैद्याचे नाव असून बुधवारी भल्या पहाटे झालेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. अलिबाग येथील जिल्हा कारागृहात असलेले जवळपास सत्तर कैदी कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्या कैद्यांना नेहुली येथे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
या कैद्यांमधे देवा मारुती दगडे याचा समावेश होता. त्याच्यावर पोलादपूर पोलिस स्टेशनला बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. त्याला 16 जानेवारी 2018 रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या 19 जानेवारी 2018 पासून तो जेलमधे होता. 20 जुलैच्या रात्री खिडकीचे गज कापून त्याने फरार होण्यात यश मिळवले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.