औरंगाबाद : नाशिक येथील एका नवरदेवाने वधूपित्याकडे दहा लाख रुपये रोख, 21 नखे असलेले जिवंत कासव, लॅब्रेडॉर प्रजातीचा काळ्या रंगाचा श्वान व एक समई अशा वस्तूंची मागणी केली. या मागणीने उपवधूसह तिच्या परिवारात खळबळ माजली. मात्र उपवधूने समयसुचकता बाळगत आपल्या पित्याच्या बजेटचा विचार करत या लग्नाला नकार दिला आहे. साखरपुडा झाल्यानंतर होवू घातलेले हे लग्न मोडण्यात आले. याप्रकरणी नाशिकच्या या परिवाराविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील रमानगर भागातील व्यावसायिकाच्या मुलीचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये नाशिक रोडवर असलेल्या डायमंड कॉलनीतील चराटे परिवारातील तरुणासोबत ठरले होते. लग्न ठरल्यामुळे वधू वरांचा साखरपुडादेखील झाला होता. त्यावेळी वधूच्या पित्याने उपवर मुलाला 2 लाख 11 हजार रुपये मुल्य असलेली अंगठी दिली होती. मात्र काही दिवसातच दचराटे परिवाराकडून मुलीच्या वडीलांकडे धनलोभातून विविध स्वरुपाच्या मागण्यांची यादी वाढू लागली. रवींद्र चराटे, आकाश चराटे यांच्यासह इतर तिघा महिलांनी त्यांना सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी सुरु केली.
या मागणीची वधूच्या परिवाराकडून पुर्तता होत नसल्याचे दिसताच चराटे परिवाराने लग्न करण्यास नकार देण्यास सुरुवात केली. भावी वधूने देखील लग्न करण्यास नकार दिला. या फसवणूकीप्रकरणी वधू पित्याने उस्मानपुरा पोलिस स्टेशनला नाशिकच्या चराटे परिवाराविरुद्ध फिर्याद दाखल करत रितसर गुन्हा दाखल केला.