एक फुल दो माली, तिच्यावरुन दोघात हमरीतुमरी

चाकूच्या घावात सुभाषने संपवली अंकुशची मुजोरी

जळगाव : लवचिक बांधा असलेली डॉली (काल्पनिक नाव) जेमतेम अठरा वर्षाची होती. वयात येताच तिचा विवाह जळगाव शहरातील पिंप्राळा – हुडको परिसरातील तरुणासोबत लावून देण्यात आला. लग्नानंतर डॉली पिंप्राळा हुडको भागात सासरी राहण्यास आली. लग्नानंतर डॉलीचे वैवाहीक जीवन तसे चांगले सुरु होते. तिच्या संसार वेलीवर क्रमाक्रमाने एक मुलगा व दोन मुली अशा तिन अपत्यांचे आगमन झाले. एकंदरीत तिच्या संसारात सर्व सुखाची रेलचेल सुरु होती. तिच्या संसाराची घडी व्यवस्थित असतांना अचानक तिच्या नशिबी एक वादळ आले. तिच्या पतीला एक आजार बळावला. पतीला आजारातून बरे करण्यासाठी डॉलीने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात तिला यश आले नाही. तिच्या पतीची प्रतिकारशक्ती कमी पडली. त्यामुळे लग्नानंतर काही वर्षातच तिच्या पतीचे निधन झाले. दरम्यानच्या काळात डॉली पंचविशीच्या घरात पोहोचली होती.पंचविशीचे तारुण्य लाभलेल्या डॉलीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले होते. तिन मुलांची माता असलेल्या डॉलीने पती निधनानंतर सुरुवातीचे काही दिवस दुखा:त घालवले. त्यानंतर पदर खोचत तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे ठरवले.

Dr.Neelabh Rohan
ASP

एमआयडीसी लगत असलेल्या रामेश्वर कॉलनी भागातील रेणूका नगरात ती राहण्यास आली. दिसायला देखणी असलेल्या डॉलीचे शिक्षण कमी होते. त्यामुळे तिला चांगला जॉब मिळणे कठिण होते. मात्र तिने कामधंदा करायचा हे निश्चित केले होते. चार ठिकाणी जावून धुणी भांडी करण्याचे तिने ठरवले. या कामातून मिळणा-या पैशातून आत्मनिर्भर होत आपला व आपल्या तिघा मुलांचा उदरनिर्वाह करण्याचे तिने मनाशी ठरवले होते.  

जळगाव शहरातील एका उद्योजकाच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी ती जावू लागली. दिसायला देखणी व मंजुळ वाणी असलेल्या डॉलीला चार ठिकाणी धुणीभांडी करण्याचे काम सहजासहजी मिळू लागले. त्यामुळे तिच्या उत्पन्नात चांगली भर पडली. ज्या उद्योजकाकडे ती धुणीभांडी करण्यासाठी जात होती, त्याठिकाणी चारचाकी वाहनावर एक तरुण चालक नोकरीला होता. त्याचे नाव अंकुश हटकर होते.

डॉली व अंकुश असे दोघे एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे साहजिकच दोघांची ओळख निर्माण झाली. ओळखीतून दोघांचा सहवास वाढत गेला. सहवासातून दोघे एकमेकांच्या जवळ आले. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. वास्तविक अंकुश हटकर हा एक विवाहीत तरुण होता. वयाची तिशी पार केलेल्या अंकुश यास एक देखणी पत्नी लाभलेली होती. त्याला एक मुलगा व दोन मुली होत्या. जळगाव शहरातील तांबापुरा भागातील रामबाबा कुटीया भागात तो आपल्या आईसह रहात होता. त्याची आई देखील चार ठिकाणी धुणीभांडी करुन चरितार्थ चालवत होती. अंकुशच्या आईचा पतीसोबत वाद झाल्यामुळे ती पतीपासून सुमारे 25 वर्षापासून विभक्त रहात होती. तिची दोन्ही मुले अर्थात अंकुशचे दोन्ही भाऊ वडीलांसमवेत धरणगाव येथे रहात होते. अंकुश आपल्या आई, पत्नी व मुलांसोबत तांबापुरा भागात रहात होता.

खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारा विवाहीत अंकुश हा लवकरच धुणीभांडी करणा-या डॉलीच्या प्रेमात पडला. अंकुशचा आपल्या मनावर अंकुश राहिला नाही. त्याने डॉलीसोबत संपर्क वाढवला. डॉलीदेखील त्याला चांगला प्रतिसाद देवू लागली. बघता बघता दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. पंचविशीतील डॉलीला अडीअडचणीत मदतीसाठी पुरुषाची गरज हवीच होती. तिला अंकुशच्या रुपात एक मदतनिस मिळाला. तो मदतनिस नंतर कालांतराने तिचा प्रियकर झाला. दोघांच्या प्रेमाची हवा अंकुशच्या घरापर्यंत जाण्यास वेळ लागला नाही. अंकुश व डॉलीच्या प्रेमाला सुरुवातीला त्याच्या घरातून आई व पत्नीचा विरोध झाला. मात्र कालांतराने तो विरोध मावळला. त्याने घरी पत्नीचे जसे लाड पुर्ण केले तसेच इकडे डॉलीचे देखील लाड पुर्ण केले. तो पत्नी व प्रेयसी डॉली या दोघांना पुरुन उरला. एके दिवशी अंकुश व डॉली यांनी एका मंदीरात जावून एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केल्याचे म्हटले जाते. तो अधून मधून वेळ काढून डॉलीच्या घरी जात असे. दोघे पती पत्नीप्रमाणे एकमेकांसोबत वागत होते. अंकुश डॉलीसाठी जणूकाही वेडापिसा आणि दिवाना झाला होता. तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे त्याला होत असे.  

अंकुश हटकर रहात असलेल्या परिसरात सुभाष मिस्तरी नावाचा तरुण रहात होता. सुतारी काम करणारा सुभाष मिस्तरी हा देखील जवळपास अंकुशच्या वयाच्या तरुण होता. एकाच परिसरात राहणारे अंकुश आणि सुभाष हे दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. सुभाष आता रामेश्वर कॉलनी परिसरातील रेणूका नगरात राहण्यास गेला. याच परिसरात अंकुशची प्रेयसी डॉली रहात होती. आता सुभाष व डॉली हे दोघे एकाच परिसरात रहात असल्यामुळे साहजिकच दोघांची नजरानजर होवू लागली. डॉलीचे सौंदर्य बघून सुभाष देखील तिचा दिवाना झाला. तो देखील तिच्यावर प्रेम करु लागला. घरातून निघण्यापुर्वी सुभाष सोबत तर कामावर गेल्यावर अंकुशसोबत तिचा संपर्क येवू लागला. अंकुश, सुभाष व डॉली हे तिघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते.

ज्याप्रमाणे अंकुश तिला मदत करत होता त्याप्रमाणेच सुभाषदेखील तिला हवी ती मदत करत होता. त्यामुळे तिच्यासाठी दोघेही तिचे प्रियकर झाले होते. अंकुश व सुभाष साठी ती एक होती, मात्र तिच्यासाठी दोघे होते. अंकुशसोबत तिचा नऊ वाजेचा वेळ राखीव असला तर सुभाष साठी दहा वाजेचा वेळ राखीव रहात होता. अशा प्रकारे ती दोघांना खुश ठेवू लागली व दोघांचे समाधान करु लागली.

दोघांकडून तिला हवी ती मदत मिळत असल्यामुळे ती दोघांचे हवे ते समाधान करत होती. मात्र सुभाषच्या तुलनेत ती अंकुशला थोडा जास्त वेळ देत होती. अंकुशला वाटत होते की डॉली केवळ आपलीच आहे. सुभाषला वाटत होते की डॉली केवळ आपलीच आहे. मात्र ती दोन्ही तबल्यावर हात ठेवून आपले हित साध्य करत होती. धुणीभांडी करण्याच्या कामातून तिला जेवढे पैसे मिळत होते त्याहून अधिक पैसे तिला दोघांकडून मिळत होते. सुतारी काम करणारा सुभाष तिच्या सर्वांगावर हात फिरवून जणू काही रंधा मारण्याचे काम करत होता. सुभाष यास विरोध केल्यास तो मद्यप्राशन करुन तिला शिवीगाळ व मारहाण देखील करत असे. मात्र भितीपोटी हा प्रकार ती अंकुशसह कुणाला सांगत नव्हती.

डॉली केवळ आपलीच आहे अशी अंकुशने मनाची समजूत केली होती. मात्र लवकरच त्याल समजले की सुभाष देखील डॉलीकडे हजेरी लावून सुख लुटण्याचे व लाटण्याचे काम करत आहे. हा प्रकार समजल्यावर तो व्यथीत झाला. येथेच अंकुश व सुभाष यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोघांना ती हवीहवीशी वाटत होती. तिचे घायाळ करणारे नेत्र, मधुर वाणी आणि लवचिक बांधा दोघांना जणूकाही घायाळ करुन सोडत होता.त्यामुळे दोघांना वाटत होते की ती केवळ आपलीच असावी.      

3 जूनच्या रात्री नऊ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे सुभाष मिस्तरीने तिच्या सर्वांगावरुन रंधा मारण्यासाठी तिच्याकडे हजेरी लावली. अर्धा तासाने तिच्याकडे जाण्याचे अंकुशचे नियोजन सुरु होते. मात्र सुभाष मिस्तरीचा तिच्या सर्वांगावर रंधा मारण्याचे काम अर्धा तास झाला तरी सुरुच होते.

साडे नऊ वाजता डॉलीच्या घरात अंकुश हजर झाला. दोघांना एकत्र बघून अंकुशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. डॉलीसह तिचे दोघे प्रियकर असे तिघे जण एकत्र आल्यामुळे वातावरण चिघळले. चुकीच्या जागी विजेचे तार एकमेकांच्या संपर्कात आल्यावर जसा फ्युज उडतो तसाच प्रकार याठिकाणी झाला. अंकुश यास बघून डॉली व सुभाष यांचा जणूकाही फ्युज उडाला होता. तर अंकुशचे तपमान प्रमाणापेक्षा जास्त  वाढले होते. त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. अंकुशने आपल्या रागावर काही प्रमाणात अंकुश मिळवत सुभाषला एका वाक्यात सुनावले. “तु मेहरुण मधील स्मशानभुमीच्या बगीच्याकडे ये” एवढे वाक्य बोलून तो तेथून निघून गेला. अशा प्रकारे बघून घेण्याची  भाषा बोलून गेलेल्या अंकुशने सुभाष यास जणू काही ललकारले होते. एका नारीसाठी दोन नर जणूकाही एकमेकांचे वैरी झाले होते. दोघे तिच्यावर दावा करत होते. दोघांना वाटत होते की डॉली आपलीच असावी.

आज सुभाषचा फैसलाच करुन टाकू असे मनाशी नियोजन करतच अंकुश घरी परत आला. त्याने त्याचा मित्र अजिज हमीद तडवी यास लाकडी बॅट घेवून घरी बोलावले. अंकुशच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सुभाष त्याच्या घराजवळ दबा धरुन उभा होता. काहीवेळाने अंकुशच्या घरी त्याचा मित्र दुचाकीवर बॅट घेवून आला. त्यावेळी रात्रीचे दहा वाजण्याचा सुमार होता. अजीज तडवी याने दाराजवळ येवून अंकुश घरी आहे का? अशी त्याच्या आईला विचारणा केली. अजीजच्या हातात बॅट बघून काहीतरी गडबड असल्याचे अंकुशच्या आईच्या लक्षात आले. तिने दरडावून त्याला विचारले की एवढ्या रात्री अंकुशसोबत काय  काम आहे? अजीज काही बोलण्याच्या आत अंकुश घरातून तयारीनिशी बाहेर आला. त्याने त्याच्या आईला म्हटले की मी लवकरच अजिज सोबत जावून येतो. दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून उभा असलेला सुभाष मिस्तरी हा देखील दोघांच्या मागेमागे गेला. आता दोघात तुंबळ हाणामारी होणार हे जवळपास निश्चित होते.

डॉलीकडून सुभाष मिस्तरी तावातावात निघून गेल्यामुळे काहीतरी अघटीत होणार याची कल्पना तिला आली होती. त्यामुळे ती देखील पायी पायी मेहरुण स्मशानभुमीलगत असलेल्या बगिच्याच्या दिशेने सरसावली. दरम्यान पाऊस सुरु असला तरी दोघा प्रियकरामधील वादळ शमणार नाही याची कल्पना डॉलीला आली होती.  

रात्री अकरा वाजून गेले होते. त्यावेळी वडाच्या झाडाखाली सुभाष मिस्तरी हा अंकुशची वाट बघत उभाच होता. अंकुशवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी सुभाषने सोबत चाकू लपवून आणला होता. सुभाषवर हल्ला करण्यासाठी अजिज सोबत आलेल्या अंकुशने लाकडी बॅट आणली होती. दोघे अमोरासमोर आल्यावर सुरुवातीला दोघात डॉलीच्या विषयावरुन कडाक्याचे भांडण सुरु झाले. शब्दामागे शब्द वाढत असल्यामुळे वाद शमण्याची चिन्हे दिसत नव्हती. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होण्यास अजिबात वेळ लागला नाही. दरम्यान हा सर्व प्रकार डॉली लांबून बघत होती.

या भांडणात अंकुशने सुभाषला लाकडी बॅटने मारहाण सुरु केली. संधी साधत सुभाषने खिशातून चाकू काढला. त्या चाकूने  अंकुशवर वार करण्यात आला. तो वार अंकुशच्या पोटावर बसला. काही क्षणात झालेल्या प्रहारामुळे अंकुश जखमी झाला. आपल्यामुळे दोघे प्रियकर आपसात लढत असल्याचे बघून डॉली मनातून पार घाबरली. तिने तेथून भर पावसात पळ काढला. आता अंकुश वाचणार नाही याची कल्पना आल्यामुळे सुभाष देखील तेथून लागलीच फरार झाला.

जखमी अंकुशला दुचाकीवर डबलसीट बसवून एमआयडीसी पोलिस स्टेशनला नेण्याचा अजीजने प्रयत्न केला. पोलिस स्टेशनला पोहोचण्यासाठी काही अंतर शिल्लक राहिले होते. तेवढ्यात हॉटेल कस्तुरीजवळ जखमी अंकुश एकाएकी  बेशुद्ध झाला. आता काय करावे हे दुचाकीचालक अजिज यास समजत नव्हते. त्याने रस्त्यावरील एक धावती रिक्षा उभी केली. उपस्थित काही नागरीकांच्या मदतीने त्याने बेशुद्ध अंकुश यास रिक्षातून शासकीय रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तपासणीअंती डॉक्टरांनी अंकुश यास मयत घोषीत केले.

या घटनेची माहीती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट देत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. विनायक लोकरे यांना तपासकामी योग्य ते मार्गदर्शन केले. पो.नि.विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदिप हजारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, संदीप पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, हे.कॉ. रतीलाल पवार,  अशोक सनगत, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, नितीन पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील, राजेंद्र कांडेकर, दीपक चौधरी, भुषण सोनार अशांचे पथक पुढील तपासकामी कार्यरत झाले.

रात्री 11.30 वाजता अजिज तडवीने अंकुशच्या घरी येवून त्याच्या आईला सर्व प्रकार कथन केला. आपल्या मुलावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार समजताच अंकुशची आई धाय मोकलून रडू लागली. तिने तात्काळ आपले जवळचे नातेवाईक जमा करत सामान्य रुग्णालय गाठले. सामान्य रुग्णालयात आल्यावर सर्वांना समजले की अंकुशचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी पोस्ट मॉर्टम रुम मधे ठेवण्यात आला आहे. त्याचा मृतदेह बघताच अंकुशची आई अजूनच धाय मोकलून रडू लागली. दरम्यान त्या ठिकाणी डॉली देखील आलेली होती. आपल्यामुळे दोन प्रियकरात झालेल्या हल्ल्यात अंकुशचे प्राण गेल्यामुळे तीच्या मनात पावसाळी वातावरणात कडाडून विजा चमकत होत्या.

मयत अंकुशच्या छातीसह हातावर चाकूच्या जखमा झालेल्या होत्या. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे अंकुशने प्राण गमावले होते. पोलिस स्टेशनएवजी अगोदर रुग्णालयात नेण्याचा अजिजने प्रयत्न केला असता तर कदाचित अंकुशचे प्राण वाचले असते असा सुर यावेळी उमटला होता. मयत अंकुशच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार फरार सुभाष मिस्तरी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाची फिर्याद भाग 5 गु.र.न.805/20 भा.द.वि.302 नुसार दाखल करण्यात आली. दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक फरार सुभाष मिस्तरीच्या मागावर होते.

पो.नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदिप हजारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, संदीप पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, हे.कॉ. रतीलाल पवार, अशोक सनगत, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, नितीन पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील, राजेंद्र कांडेकर, दीपक चौधरी, भुषण सोनार यांच्या पथकाने सापळा रचला. लपून बसलेल्या सुभाष मिस्तरी यास बंद घरातून ताब्यात घेण्यात पथकाने रातोरात यश मिळवले. त्याला पो.नि. विनायक लोकरे यांच्या समक्ष हजर करण्यात आले.चौकशीअंती त्याने सदरचा गुन्हा कबूल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडीत असतांना त्याने गुन्हयात वापरलेला चाकू पोलिसांना काढून दिला. गुन्हयात वापरलेला चाकू आपल्याजवळ पुर्वीपासून असल्याचे त्याने सांगीतल्याचे समजते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. संशयित आरोपी सुभाष मिस्तरी हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास पो.नि. विनायक लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे व त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल रतिलाल पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here