बुलढाणा (हिवरा आश्रम) : रायपूर येथे असलेल्या सोनार गव्हाण रस्त्यावरील कैलास काकडे यांच्या गोठ्याला 20 जुलैच्या रात्री अचानक लागलेल्या आगीत दोन गाईं मृत्युमुखी पडल्या आहेत. गोठ्यात ठेवलेले शेतीचे साहित्य देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने शेतक-याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रायपूर येथील रहिवासी असलेले कैलास काकडे यांचा सोनार गव्हाण रस्त्यावर गुरे बांधण्याचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांनी शेतीला लागणारे साहित्य ठेवले होते. तसेच त्या गोठ्यात दोन गीर गाई बांधल्या होत्या. या गोठ्याच्या बाजुलाच संदीप वाहेकर व संतोष सुसर यांचा देखील गुरे बांधण्याचा गोठा आहे. संदीप वाहेकर हे गुरांना चारा – पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना काकडे यांच्या गोठ्याला आग लागल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती गावक-यांना दिली. गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दोन गीर गाई जळून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. याशिवाय ड्रीप, स्पिंकलरचे पाईप, बी. बियाणे, कीटकनाशके, मोटार, स्टॅटर, वखर, पेरणी यंत्र असे साहित्या देखील जळून खाक झाले.