जळगाव : विमान अपघातात जखमी झालेल्या कॅप्टन पायलट व सह पायलट यांना रुग्णवाहिकेपर्यंत तिन कि.मी. अंतर वाहून नेण्याकामी बांबूचे स्ट्रेचर करण्यासाठी अंगावरील साडी फाडून देणा-या आदिवासी मातेचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून आज सत्कार करण्यात आला.
16 जुलै रोजी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वर्डी या आदिवासी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले होते. पहाडी निर्मनुष्य भागात कोसळलेल्या विमानाच्या प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुजर व कॅप्टन पायलट नुरुल अमीन हे दोघे जबर जखमी झाले होते. या आदिवासी भागात कुठलीही सोय वा सुविधा नव्हती. माणूसकी जपणा-या आदिवासी बांधवांनी या दोघा जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत वाहून नेण्यासाठी बांबूची झोळी अर्थात स्ट्रेचर तयार केले. या स्ट्रेचरसाठी कापड लागणार होते. आदिवासी माता विमलबाई भिल (61) यांनी आपल्या अंगावरील साडी फाडून ती झोळी तयार करण्यासाठी उपलब्ध करुन दिली.
समयसुचकता दाखवणा-या या आदिवासी मातेचा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचनेनुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या महिला सहकारी कर्मचा-यांनी आज साडीचोळी व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.