जळगाव: जळगाव शहराच्या ट्रान्सपोर्ट नगरातून शनिवारी रात्री चोरट्यांनी ट्रक लांबवल्याची घटना घडली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
वसीम अली शेरअली तेली (28) रा. फातेमा नगर व शेख तौसिफ शेख युनूस (22) रा. तांबापुरा अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. ट्रकचोरी केल्यानंतर औरंगाबाद येथे ट्रक विक्रीसाठी चोरटे जात होते.
तत्पूर्वी एमआयडीसी पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात यश मिळवले.चोरट्यांकडून चोरीचा ट्रक देखील हस्तगत करण्यात आला आहे.अफझल अब्बु खान (50) रा. रामोशी वाडा नाशिक हे गेल्या पाच वर्षांपासून ट्रक (एमएच 41 जी 5534) वर चालक म्हणून कामाला आहेत. मालवाहतूक भाडे घेवून ते वाहतूक करतात.
10 जुलै रोजी चोपडा येथे युरीया खत वाहतुकीची त्यांना ट्रीप मिळाली. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता चोपडा येथे भरलेला ट्रक त्यांनी रिकामा केला. सायंकाळी सहा वाजता ते पुन्हा जळगावला आहे.
त्यानंतर शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील खूशी ट्रान्सपोर्ट नजीक त्यांनी ट्रक उभा केला. जेवण करण्यासाठी ते गेले. पुन्हा आल्यावर रात्री 8.30 वाजता ट्रक जागेवर नव्हता.
ट्रक चोरीची खात्री त्यांची खात्री झाली. त्यामुळे अफजल खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुप्त माहितीनुसार चोरी झालेला ट्रक जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात व्ही सेक्टर परिसरात येत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक मुद्दस्सर काझी यांना मिळाली.
पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, महेंद्रसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, इम्रान सय्यद, नितीन पाटील, प्रदीप पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, असीम तडवी, निलेश पाटील, सतिष गर्जे यांनी सायंकाळी 6.30 वाजता भारत गॅस गोडावून परिसरात ट्रक अडविला.
ट्रकमध्ये वसीम अली शेरअली तेली, शेख तौसिफ शेख युनूस असे दोघे आढळले. त्यांनी ट्रकचोरीची कबूली पथकाला दिली. ट्रक औरंगाबाद येथे विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बारी करत आहेत.अटकेतील दोघे सराईत गुन्हेगार आहेत.वसीम तेली यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे, जळगाव शहर पोलीस, जिल्हापेठ तसेच नंदुरबार रेल्वे, औरंगाबाद जिल्ह्यातील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शेख तौसिफ याच्यावर बीड ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत.