औरंगाबाद : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी टोलनाक्यावरील दोघा कर्मचा-यांनी तरुणाला भोसकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अजय तळणकर (रा. तिसगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेश पठारे (बेगमपुरा) व कपुर सलामपुरे (रा. गोलवाडी) असे फरार झालेल्या दोघा हल्लेखोरांची नावे आहेत.
शुभम गाडगे, प्रलय प्रेमदास बोदले, मनेश लक्ष्मण गाडे, आनंद भालेराव आणि ऋषी काटकर या मित्रांसह अजय तळणकर हा 22 जुलैच्या रात्री कारमधून औरंगाबादच्या दिशेने येत होता. त्यावेळी अजय तळणकर हा कार चालवत होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास गोलवाडी टोलनाक्याच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी त्याने कार उभी केली. त्यावेळी अचानक दोघा टोल नाका कर्मचा-यांनी त्याला जवळ बोलावून शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. 19 जुलैच्या मध्यरात्री अजयचा हल्लेखोरांसोबत वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी टोल कर्मचा-यांनी अजयवर प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी अजयने देखील दोघा टोल कर्मचा-यांसोबत चापट मारत झटापट केली.
यावेळी कारमधील अजयचे मित्र त्याच्या बचावासाठी आले. दरम्यान हल्लेखोरांपैकी एकाने अचानक चाकू काढून अजयवर प्राणघातक हल्ला केला. रक्तस्राव झाल्याने अजय जमीनीवर कोसळला. मित्रांनी त्याला लागलीच घाटीत दाखल केले. दरम्यान हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाले होते. हल्ला करणा-यांपैकी एकाचे नाव गणेश कपूर असल्याचे समजल्याने त्याच्यासह दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.