औरंगाबाद : गावठी बनावटीचा कट्टा बाळगत गोंधळ माजवणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. रामचंद्र रमेश जायभाये (कुंभेफळ, जि.बुलडाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, जमादार राठोड, दांडगे, शिंदे, तांदळे आणि शिंदे यांच्या पथकाने आईसाहेब चौकाकडे धाव घेत रामचंद्र जायभाये यास अटक केली. त्या वेळी रस्त्यावर दोघांत वाद सुरु होता. पोलिसांचे वाहन आल्यानंतर त्यातील एकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत रामचंद्र जायभाये याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.