शालकाच्या रागाची सल मेहुण्याच्या मस्तकात! —- कु-हाडीचे तिन घाव बसले विशालच्या डोक्यात!!

जळगाव : अश्विनीचे वडील मुख्याध्यापक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याधापक असलेले वामन चावदस ठोसरे यांची अश्विनी एकुलती एक मुलगी होती. दोघा भावांची एकुलती बहिण अश्विनी लग्नायोग्य झाली होती. लग्नायोग्य झालेल्या अश्विनीसाठी मुख्याध्यापक वामन ठोसरे स्थळ शोधत होते. ज्ञानदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले वामन ठोसरे यांच्या  घरात जणू काही सरस्वतीचे वास्तव्य होते. सरस्वतीच्या रुपातील अश्विनीच्या लग्नाचा योग जुळून येण्यासाठी वामन ठोसरे सतत  प्रयत्नशील होते. वर संशोधनासाठी ते गावोगावी नातेवाईकांकडे प्रवास करत होते. नातेवाईकांच्या मदतीने त्यांचे वर संशोधनाचे काम अव्याहतपणे सुरुच होते. दरम्यान त्यांना यावल तालुक्यातील चुंचाळे येथील विजय चैत्राम सावकारे या तरुणाचे स्थळ योग्य वाटले.  निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत भावी वर – वधूचा परिचय व बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत दोन्ही पक्षाकडून होकार मिळाल्यानंतर विवाहाची यशस्वी बोलणी करण्यात आली. विजय व अश्विनी या दोघांचा विवाह मुख्याध्यापक वामन ठोसरे यांनी थाटामाटात लावून दिला. 

विजय व अश्विनी यांच्या वैवाहीक जिवनाला सुरुवात झाली. दिवसामागून दिवस जात होते. सुरुवातीचे दोन वर्ष दोघांचा संसार गोडीगुलाबीने सुरु होता. मात्र नंतर अश्विनी व विजय यांच्यात काही ना काही कारणावरुन कुरबुरी सुरु झाल्या. दोघा पती पत्नीत वाद सुरु झाले. त्यातून विजय तिचा छळ करु लागला. सुरुवातीचे दिड ते दोन वर्ष सुखाने सुरु असलेल्या संसाराला वादाची किनार लागली. त्यामुळे दोघा पती पत्नीचे आपसात पटेनासे झाले. त्यामुळे अश्विनी आपल्या माहेरी मुक्ताईनगर येथे राहण्यास आली. आपल्याला छळणा-या पतीला अद्दल घडवण्याची जिद्द बाळगत अश्विनीने विजय विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला भा.द.वि.498 अ कलमाखाली गुन्हा दाखल केला. तसेच मुक्ताईनगर न्यायालयात खावटी मागणीसाठी धाव घेतली. अशाप्रकारे पती पत्नीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले. विवाहीत मुलगी सासरहून माहेरी परत आल्यामुळे ज्ञानदानाचे कार्य करणा-या शिक्षकाच्या जिवाला घोर लागला होता.

विवाहीत मुलगी किती दिवस माहेरी राहणार असा प्रश्न काही नातेवाईक उघड तर काही खासगीत बोलत होते. निवडक नातेवाईकांच्या बैठकीत तडजोड करण्याचे नियोजन करण्यात आले. मागचे विसरुन विजय व अश्विनी या दोघांनी नव्याने सुखी संसार करावा असे ठरवण्यात आले. आता अश्विनीला त्रास दिला जाणार नाही वा काही मागणी केली जाणार नाही या अटीवर तीला पुन्हा सासरी चुंचाळे येथे विजयसोबत रवाना करण्यात आले. खुप दिवसांनी सासरी आलेल्या अश्विनीसोबत विजय काही दिवस चांगला वागला. मात्र तिने पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या गुन्ह्याची व न्यायालयात दाखल केलेल्या खावटीच्या मागणीची आठवण त्याच्या मनात होती. या कालावधीत त्याला शालक विशालचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता. ती सल त्याच्या मनात कायम होती.

अश्विनी गेल्या काही दिवसांपासून त्वचेच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिच्यावर जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु होता. हा उपचार तिचे वडील करत असल्यामुळे ती माहेरी मुक्ताईनगर येथे आली होती. तिचा भाऊ विशालची पत्नी बारावीचे पेपर देण्यासाठी माहेरी गेली होती. 14 जुलै रोजी विजय सावकारे हा अश्विनीला घेऊन जाण्यासाठी सासरी मुक्ताईनगर येथे आला. मात्र सास-यांचा पगार झालेला नव्हता. त्यामुळे पाहुणचारासाठी त्यांनी जावई विजय यास दोन दिवस मुक्काम करण्यास सांगितले. त्यामुळे विजय सासरी मुक्कामी थांबला.

दुस-या दिवशी सायंकाळी घरातील सर्व सदस्यांनी सोबत जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर रात्रीच्या वेळी घरातील सर्व महिलांनी घरात खालच्या मजल्यावर झोपण्याची तयारी केली. वरच्या मजल्यावर अश्विनीचा भाऊ विशाल व जावई विजय सावकारे यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. दुस-या दिवशी सकाळी लवकर अश्विनीच्या वैद्यकीय उपचारासाठी जळगाव येथे जायचे होते. त्यादृष्टीने तयारी सुरु होती.

शालक विशालने विजयला वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी नेले. विशालने मेहुणा विजय यास म्हटले की तुम्ही लहान मुलांवर लक्ष ठेवा, मुले रस्त्यावर जातात. असे म्हणत विशालने खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद करुन घेतला. काही वेळाने विशाल पुन्हा वरच्या खोलीत आला. विजय खाटेवर आणि विशाल दुस-या कॉटवर झोपला. कामाच्या व्यापामुळे विशाल लागलीच झोपून गेला. त्याच वेळी विज पुरवठा खंडीत झाला. विज गेल्यामुळे सर्वत्र अंधार झाला. अंधार झाल्यामुळे विजय कासाविस झाला होता. कासाविस झालेला विजय वरच्या मजल्यावरुन खाली गेटपर्यंत व तेथून पुन्हा वरच्या मजल्यावर ये – जा करत होता. त्यावेळी विशाल झोपेतच होता.

डिवायएसपी विवेक लावंड, पो.नि. राहुल खताळ, पो.उ.नि.निलेश सोलंकी, पो.उ.नि.सुदाम काकडे

पती पत्नीचा पुर्वी झालेला वाद, तिने न्यायालयात दाखल केलेली खावटीची केस, पोलिस स्टेशनला दाखल केलेला गुन्हा, त्यानंतर झालेला समझौता या सर्व घटना रात्रीच्या अंधारात कासाविस झालेल्या विजयच्या नजरेसमोर येण्यास सुरुवात झाली. समोरच झोपलेला त्याचा शालक विशाल आपल्याला मारेल अशी भिती विजयला सतावत होती. विशाल आपल्याला मारेल असा विचार राहून राहून विजयच्या मनात येत होता. विशाल मात्र गाढ झोपेत होता. विज पुरवठा खंडीत झाल्याचे त्याला माहिती देखील नव्हते. जवळपास बारा वेळा विजयने वरच्या मजल्यावरुन खाली व खालच्या मजल्यावरुन वर येरझा-या घातल्या. विशाल आपल्याला मारेल या नकारात्मक विचाराने विजय ग्रासला होता.

विजयच्या डोळ्यातील झोप केव्हाच उडाली होती. विशाल आपल्याला मारेल त्यापेक्षा आपणच त्याला मारुन टाकू असा कुविचार विजयला सताऊ लागला. त्याच वेळी विजयला खाटेच्या बाजूस भिंतीजवळ एक कु-हाड दिसली. त्यावेळी रात्रीचे पावणे – चार वाजले होते. कु-हाड दिसताच विजयने ती हातात घेतली. दुर्बुद्धी सुचलेल्या विजयने त्या कु-हाडीचे दोन जोरदार घाव गाढ झोपेतील विशालच्या डोक्यात घातले. दोन घाव केल्यानंतर देखील विजयने तिसरा घाव त्याच्या डोक्यात पुन्हा घातला. तिसरा घाव देखील तेवढाच जोरदार होता. तिस-या घावात कु-हाडीचा दांडाच तुटला व कु-हाड विशालच्या डोक्यात अडकली. कु-हाडीचे सलग तिन घाव डोक्यात बसल्यामुळे विशाल यास बचावाची व ओरडण्याची देखील संधी मिळाली नाही. तो जागीच ठार झाला होता. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता.

आता विजय मनातून पार घाबरला. रक्ताने माखलेलेली व दांडा तुटलेली ती कु-हाड विजयने तशीच पलंगावर ठेवत तेथून पळ काढला. मोटार सायकलची चावी त्याच्या पॅंटच्या खिशातच होती. त्यामुळे  त्याने तात्काळ चावी आणि किकच्या सहाय्याने मोटार सायकल सुरु केली व पलायन केले. आता विजयच्या मनात पोलिसांची भिती सुरु झाली. पोलिस आपल्याला पकडतील या भितीने त्याच्या मनाची गाळण सुरु झाली. पोलिस आपला पाठलाग करत असतील हा विचार त्याच्या मनात सुरु असतांना त्याने मोटारसायकल चांगदेव कडे जाणा-या रस्त्यालगतच्या एका शेतातील गोठ्यासमोर लावली. तेथून तो पायीच एका केळीच्या बागेत गेला.

दुस-या दिवशी 16 जुलै रोजी अश्विनीच्या वैद्यकीय उपचारासाठी जळगावला घेऊन जाण्याचे सर्वांचे नियोजन होते. त्यामुळे अश्विनी व तिची आई सकाळी लवकर तयारी करण्यासाठी उठल्या. अश्विनीची आई स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करु लागली. त्यावेळी तिच्या वडीलांना जावई विजयची मोटारसायकल बाहेर गेटजवळ दिसली नाही. मोटार सायकल कुठे गेली? कुणी नेली? याचा शोध घेण्यासाठी ते बाहेर आले. त्यांनी घरात सर्वांना जावई कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर आम्हाला काहीच माहीती नाही असे उत्तर त्यांना पत्नी व मुलीकडून मिळाले.

अश्विनीची आई वरच्या मजल्यावर जावई विजयला बघण्यास गेली असता समोरचे भयावह दृश्य बघून तिची जणू काही शुद्धच हरपली. मुलगा विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून अश्विनीच्या आईने जोरजोरात आरडाओरड व रडण्यास सुरुवात केली. अश्विनीच्या आईचा जोरजोरात आक्रोश बघून व ऐकून अश्विनी व तिचे वडील वामन ठोसरे धापा टाकत वरच्या मजल्यावर आले. त्यांना देखील खोलीत विशालच्या डोक्यातील कु-हाडीच्या घावाचे भयावह दृश्य दिसून आले. जावयानेच आपल्या मुलाचा खून करुन पलायान केल्याचे त्यांच्या लक्षात आले. जवळच लाकडी दांडा तुटलेली कु-हाड पडलेली होती. मुख्याध्यापक वामन ठोसरे व त्यांच्या पत्नीसह मुलगी अश्विनीच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. त्यांचा विलाप बघून आजुबाजूचे लोक जमा होण्यास वेळ लागला नाही. गावातच वेगळा राहणारा त्यांचा मुलगा चंद्रकांत व सुन देखील तेथे धावत आले. त्यांनी देखील समोरचे भयावह दृश्य बघून रडण्यास सुरुवात केली.

या घटनेची खबर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला देण्यात आली.  या घटनेप्रकरणी वामन ठोसरे यांनी दिलेल्या खबरीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला विजय सावकारे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 253/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड व पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. निलेश सोलंकी, पो.उ.नि. सुदाम काकडे, हे.कॉ.श्रावण जवरे, क्राईम रॉयटर पोलिस नाईक संतोष नागरे, पो.कॉ. दिलीप पाटील, कांतीलाल केदारे, गोपीचंद सोनवणे, देवीसिंग तायडे, नितीन चौधरी आदींनी पुढील तपास सुरु केला.  

घटनेच्या दिवशी 16 जुलै रोजी भितीपोटी फरार झालेला विजय दिवसभर केळीच्या शेतात बसून होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते. रात्र झाल्यानंतर तो केळीच्या शेतातून हळूच बाहेर आला. चिंचोल गावातून तो यावल तालुक्यातील त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकलचा क्रमांक पोलिसांनी माहिती करुन घेतला होता. तो खून करुन पळालेला विजय सावकारे असल्याचे पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली व मोटार सायकलचा क्रमांक बघून ओळखले होते. मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवले. अगोदरच घाबरलेला विजय पोलिसांना बघून जास्तच घाबरला. त्याला पो.नि. राहुल खताळ यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. 

पत्नी अश्विनी हिने ज्यावेळी पोलिसात तक्रार दाखल करत न्यायालयात खावटीची मागणी केली होती त्यावेळी शालक विशाल ठोसरे याने आपल्याला फार त्रास दिला होता असे विजयने पोलिसांना सांगितले. तेव्हापासून शालक विशालबद्दल विजयच्या मनात राग होता. तो आपल्याला मारेल अशी भिती त्याच्या मनात घर करुन बसली होती. या विचारानेच त्याला झोप लागत नव्हती. त्यामुळे घरातील कु-हाडीचे सलग तिन घाव विजयने विशालच्या डोक्यात घातले. दोन घाव घातल्यानंतर तिस-या घावात कु-हाडीचा दांडा तुटला व कु-हाड विशालच्या डोक्यात फसली होती.

अवघ्या चार महिन्यापुर्वी लग्न झालेल्या विशालचा खून झाल्याने त्याच्या पत्नीवर मोठे आभाळ कोसळले. घटनेच्या दिवशी ती बारावीची परिक्षा देण्यासाठी माहेरी गेली होती. शालकाची हत्या करणा-या विजय सावकारे यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. विजय सावकारे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डिवायएसपी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुल खताळ व त्यांचे सहकारी पो.उ.नि. निलेश सोलंकी, पो.उ.नि. सुदाम काकडे, हे.कॉ.श्रावण जवरे, क्राईम रॉयटर पोलिस नाईक संतोष नागरे, पो.कॉ. दिलीप पाटील, कांतीलाल केदारे, गोपीचंद सोनवणे, देवीसिंग तायडे, नितीन चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here