जळगाव : मिनिस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे सांगुन सेवानिवृत्त कर्मचा-याची 45 लाख 50 हजार 881 रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या दोघा सायबर ठगांना सायबर सेलच्या पथकाने कानपूर व दिल्ली येथून ताब्यात घेत अटक केली आहे. राहुल पांडे व रुपेशकुमार अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या अटकेपुर्वी या गुन्ह्यातील पुष्पंदर कुमार या फळ विक्रेत्या सायबर ठगास 12 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
प्रमोद कुमार मुगतलाल शाह, (76) रा. आदर्श नगर जळगाव या सेवानिवृत्त कर्मचा-यास ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मितेश कुमार सिंग, अशोक कुमार सिंग, एमटी सिंग अशा बनावट नावांनी वेळोवेळी फोन आले होते. तिघा बनावट नावे धारण करणा-या भामट्यांनी प्रमोद कुमार शाह यांना मिनिस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे खोटे सांगितले होते. प्रमोदकुमार शहा यांनी काढलेल्या पॉलीसीद्वारे त्यांना 94 लाख 69 हजार 864 रुपये मिळवून देण्याचे आमिष या तिघा भामट्यांनी प्रमोदकुमार शहा यांना दाखवले होते. त्यांच्या बोलण्यात शहा फसले.
सर्व्हिस चार्जेस, सिक्युरिटी डिपॉजीट, पॉलीसीच्या रकमेवरील आयकर, स्टेट ट्रान्स्फर चार्जेस अशी विविध कारणे दाखवत या भामट्यांनी शहा यांच्याकडून वेळोवेळी 45 लाख 50 हजार 881 रुपये कॅनरा बैंक, बेस बैंक, बैंक ऑफ इंडिया या बॅंकाच्या खात्यात ऑनलाईन स्विकारले. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, आयकर विभाग, सेंट्रल बँक यांचे नाव, लोगो व स्टॅम्प असलेली बनावट कागदपत्रे तयार करुन तिघा भामट्यांनी पोस्टाने शहा यांच्या घरी पाठवून दिली. या फसवणूकी प्रकरणी प्रमोदकुमार शहा यांनी सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा भाग-5 गु.र.नं. 1/21 भा.द.वि. 420, 465, 467, 468, 471, 488, 120 (ब) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (डी) नुसार 5 जानेवारी रोजी दाखल केला होता.
पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. फिर्यादी प्रमोदकुमार शहा यांना आलेले ई मेल, मोबाईल क्रमांक, बैंक खाते आदींचे निरीक्षण करण्यात आले. तपासादरम्यान पुष्पंदर कुमार पिता रामदिन कनौजिया (29), व्यवसाय-फळ विक्रेता, रा-१/वी लक्ष्मणबाग, ऑफीसर कॉलनी, नवाबगंज, कानपुर, गणेश चौक, मंडावली, दिल्ली हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला 12 जुलै 2021 रोजी शिताफीने अटक करण्यात आली होती. अटके दरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार राहुल पांडे पिता- दिनेशकुमार पांडे (29) या नोएडा – उत्तर प्रदेशातील बेरोजगार तरुणासह रुपेश कुमार पिता गिरीजानंद रा. दिल्ली या दोघा तरुणांची नावे पुढे आली.
पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक अंगत नेमाने व पोलिस नाइक दिलीप चिंचोले यांनी तांत्रिक तपसात या दोघांचे मुळ पत्ते व बॅंक खात्यासह सर्व तपशील संकलीत केला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पो.उ.नि. अंगत नेमाने यांच्यासह पो.हे.कॉ. प्रविण वाघ, पो.ना. दिलीप चिंचोले, पो.कॉ. अरविंद वानखेडे व पो.कॉ. पंकज वराडे आदींचे पथक 18 जुलै 2021 रोजी दिल्ली येथे रवाना केले. त्यात राहुल पांडे हा कानपुर, उत्तर प्रदेश येथे त्याच्या गावी निघुन गेला असल्याचे पथकास समजले. पो.हे.कॉ. नरेंद्र वारुळे व पो.कॉ. दिपक सोनवणे यांनी तपास पथकास वेळोवेळी तांत्रिक मदत पुरवली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथक दिल्ली येथून कानपूर येथे रवाना झाले. राहुल पांडे यास कानपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यातील राहुल पांडे याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा दुसरा साथीदार रुपेश कुमार याचे नाव पुढे आले. रुपेश कुमार हा लक्ष्मी नगर, दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर चालवत होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाने दिल्ली गाठली. दिल्ली येथे अजून काही आरोपी मिळण्याची शक्यता बळावल्याने पो.नि. बळीराम हिरे व पो.कॉ. गौरव पाटील असे दोघे जण दिल्ली येथे आले. रुपेश कुमार व त्याचे दिल्ली, गाझीयाबाद येथील साथीदारांचा शोध घेण्याकामी पो.नि. बळीराम हिरे यांनी दोन तपास पथकांची निर्मीती केली. लक्ष्मी नगर, दिल्ल्ली येथील लक्ष्मी नगर भागातून रुपेश कुमार यास ताब्यात घेत अटक करण्यात पथकाला यश आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेतील दोघा सायबर ठगांना 27 जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.