जळगाव : घर भाड्याने देण्याची जाहिरात देणा-या शिक्षकाला चोवीस हजाराचा गंडा घालणा-या ठगाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राधाकृष्ण भाटीया हे जैन हिल्स परिसरात वास्तव्याला असून अनुभुती इंटरनॅशनल शाळेत शिक्षक आहेत. संजय भाटीया यांच्या मालकीचा उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक फ्लॅट आहे. तो फ्लॅट रिकामा पडून आहे. रिकामा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी त्यांनी 99 एकर या वेबसाईटवर जाहीरात दिली होती. त्या जाहिरातीनुसार संजय भाटीया यांना 23 जुलै रोजी एक कॉल आला. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने त्यांना आपले नाव रणदीप सिंग असे सांगीतले. आपण आर्मीमधे नोकरी करत असून आपल्याला फ्लॅटची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. त्यावर संजय भाटीया यांनी त्याला दरमहा 12 हजार रुपये आणि डिपॉजीटच्या स्वरुपात एक महिन्याचे भाडे असे एकुण 24 हजार रुपये लागतील असे सांगितले.
पलीकडून रणदिप सिंग असे नाव सांगणा-या व्यक्तीने घरभाडे निश्चित करत भाटीया यांच्याकडून त्यांच्या बॅंक खात्याचा क्रमांक देखील घेतला. मात्र आपले आर्मीचे खाते असून मला त्यातून थेट पैसे टाकता येत नसल्याचे पलीकडून बोलणा-याने भाटीया यांना म्हटले. त्याने त्याच्या परिचित असलेल्या अनुकल्प अनिल या व्यक्तीचा बॅक खाते क्रमांक व इतर तपशील दिला. पैसे देण्याएवजी रणदिप सिंग याने भाटीया यांच्याकडून गोड बोलून दोन वेळा प्रत्येकी बारा हजार रुपये असे एकुण चोवीस हजार रुपये अनुकल्प अनिल या व्यक्तीच्या खात्यात मागवून घेतले. भाटीया यांनी पैसे घेण्याएवजी चोवीस हजार रुपये विश्वासाने खात्यात जमा केले. मात्र आपले पैसे परत मिळत नसल्यामुळे भाटीया यांनी त्याला पैसे मागितले. त्यावर कथीत रणदीप सिंग याने अजून पंचवीस हजार रुपये द्या तेव्हा मी तुमचे पैसे देतो असे म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय भाटीया यांनी रणदीप सिंग व त्याचा साथीदार अनुकल्प अनिल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.








