धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे शिवारात गावठी पिस्तूल-खरेदीनंतर दोंडाईचामार्गे राजस्थानकडे पलायन करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एलसीबीच्या या कारवाईत 3 पिस्तूल, 16 जिवंत काडतूस व वाहन जप्त करण्यात आले आहे. शिंदखेडा पोलिस स्टेशनला या प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी पिस्तूल खरेदीसाठी आलेले काही लोक स्कॉर्पिओ वाहनाने (जीजे-08-बीबी-5069) दोंडाईचा मार्गे राजस्थानकडे पलायन करणार असल्याची गुप्त माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे चिलाणे गावाच्या हद्दीत पोलिसांनी संशयीत वाहन अडवले. पथकाला पाहताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र दोघे पोलिसांच्या हाती लागले.
कंवरराम केसाराम जाट (27), जि. बाडमेर, राजस्थान व विक्रमसिंग भवरसिंग राजपूत (21), रा. जोधपूर, राजस्थान अशी नावे त्यांनी पोलिसांना सांगितली. झडतीदरम्यान 44 हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तुल, 12 हजारांचे गावठी पिस्टल, तीन हजार रुपयांचे मॅगझिन, सोळा हजार रुपयांचे 16 जिवंत काडतूस तसेच मोबाइल व स्कॉर्पिओ या वाहनासह एकूण 6 लाख 1 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला आहे.

मध्यरात्री शिंदखेडा पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी प्रकाश सोनार, संजय पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, कैलास महाजन यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







