सांगली : प्रत्येक व्यवसायात कमी अधिक प्रमाणात स्पर्धा असते. स्पर्धा निकोप असावी असे म्हटले जाते. मात्र बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असतो. जसजसा व्यवसाय वाढत जातो, प्रगती होते त्या प्रमाणात व्यावसायिक हितशत्रू देखील वाढत जातात हि जमान्याची एक रित आहे.
व्यावसायिक स्पर्धा एक ठराविक मर्यादेत असली तर काही वाटत नाही. मात्र एखाद्याला कायमचे संपवून त्या व्यवसयात आपला जम बसवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते कधीही चुकीचे म्हटले जाते. व्यावसायिक मनुष्याने डोक्यावर बर्फ ठेवून वागायचे असते.
काही दिवसांपुर्वी सांगली नजिकच्या कुपवाड एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी दत्तात्रय पाटोळे यांची हत्या झाली. रोहीणी कोल्ड स्टोरेज या ठिकाणी ही खूनाची घटना घडली.
व्यावसायीक वाद व पुर्ववैमनस्यातून हा हत्येचा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. दत्तात्रय पाटोळे यांच्या हत्येने कुपवाडा आणि सांगली परिसरात चांगलीच खळबळ माजली. मात्र पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या खून प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
सांगली-कुपवाड येथील वाघमोडे नगरमध्ये दत्तात्र पाटोळे रहात होते. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते.एमआयडीसी कंपन्यांना कामगार पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. ते रहात असलेल्या वाघमोडे नगरात निलेश गडदे हा देखील लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होता. त्यामुळे साहजिकच पाटोळे व गडदे यांच्यात व्यावसायिक स्पर्धा होती.
एकमेकांकडे रागाने बघणे, एकमेकांना दमबाजी करणे असा प्रकार दोघात नित्याचा झाला असल्याचे बोलले जात होते. घटनेच्या काही दिवसांपुर्वी दोघात जोरदार वाद देखील झाल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष असल्याने दत्तात्रय पाटोळे यांचा परिसरात मोठा वचक होता. व्यावसायिक प्रतिस्पर्धी असलेल्या निलेश गडदे यांच्या मनात पाटोळे यांच्याविषयी राग होता.
10 जुलै रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास कुपवाडा येथील रोहिणी कोल्ड स्टोरेज या ठिकाणी पाटोळे व गददे यांची नजरानजर झाली. गडदे व त्यांच्या साथीदारांनी पाटोळे यांची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नक्कीच दगाफटका होणार याची पाटोळे यांना जाणीव झाली. त्यांनी आपली दुचाकी थांबवली नाही.
दत्तात्रय पाटोळे थांबत नसल्याचे बघून हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात आणि पोटात धारदार शस्त्रांने सपासप वार करण्यास सुरुवात केली. काही वेळातच पाटोळे जमीनीवर कोसळले. त्यांची हत्या झाली. या घटनेची वार्ता परिसरात व शहरात पसरण्यास वेळ लागला नाही. दरम्यान सर्व हल्लेखोर पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. श्रीकांत पिंगळे, पो.उ.नि. प्रवीण शिंदे व सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. घटना घडली त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मयत पाटोळे यांचा मित्र परिवार व कार्यकर्त्यांकडून माहिती संकलीत करण्यात आली. यासोबतच पोलिसांच्या खब-यांना देखील कामाला लावण्यात आले.
चोवीस तासाच्या आत खब-यांकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. दत्तात्रय पाटोळे यांचे मारेकरी जत तालुक्याच्या जिरग्याळ येथील कुरणात लपून बसले असल्याची ती माहिती होती. गुप्त पद्धतीने सापळा रचून पोलिस पथकाने पाच जणांना जेरबंद केले. निलेश गडदे, सचिन चव्हाण, वैभव शेजाळ, मृत्युंजय पाटोळे आणि निलेश लोखंडे अशा पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
अवघ्या चोवीस तासात एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि.श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेकरी ताब्यात घेण्यात यश आले. याकामी पो.नि. श्रीकांत पिंगळे व त्यांचे सहकारी पो.उ.नि. प्रवीण शिंदे तसेच प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, अनंत खडे, शरद माळी, स.फौ. सागर पाटील, जगन्नाथ पवार, बिरोबा नारळे, सागर लावते, निलेश कदम, जितेंद्र जाधव, मेघराज रुपनर, अरुण औताडे, अमित परीट, सुधीर गोरे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, शशिकांत जाधव, सुनील लोखंडे, मुद्दस्सर पाथरवट, आत्मसिधा खोत, राजू शिरोळकर, राजू मुळे, संजय पाटील, सचिन कणप, वैभव पाटील, विकास भोसले, संजय कांबळे, सुहेल कार्तीयानी, अजय बेंद्रे, सचिन सूर्यवंशी, अरुण सोकटे, स्वप्नील नायकोडे, सुवर्णा देसाई, प्रशांत माळी, आर्यन देशिंकर, ऋषिकेश सदामते, गौतम कांबळे यांनी परिश्रम घेतले.