इश्काच्या खेळात मित्रांनीच केला विश्वासघात!—- पोलिस तपासात उलगडला बनावटी अपघात!!

धुळे : संदीप विश्वासराव बोरसे आणि राकेश मधुकर कोळी हे दोघे बालपणीचे मित्र होते. धुळे तालुक्यातील सरवड या गावी दोघे रहात होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यानंतर दोघांनी आपआपला अर्थार्जनाचा मार्ग निवडला. संदीप हा धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला तर राकेश शेती करु लागला.

शिक्षकी पेशा सांभाळणारा संदीप बोरसे  आणि शेती सांभाळणारा राकेश कोळी हे दोघे बालपणीचे मित्र आता तरुण झाले होते. दोघांची बालपणापासून असलेली मैत्री सा-या गावाला परिचीत होती. जवळच असलेल्या पाडळदे या गावी राहणारा शरद दयाराम राठोड हा तरुणदेखील आता त्यांचा मित्र झाला. त्यामुळे संदीप, राकेश आणि शरद हे तिघे मित्र सुटीच्या दिवशी एकत्र भेटून फिरायला जात. ज्ञानदानाचे कार्य करणारा संदीप हा दोघा मित्रांसोबत अनेकदा मद्यपान करण्यास बसून जात होता. शाळेत विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींचे विचार सांगणारा संदीप मित्रांसोबत मात्र मद्यपान करत होता. तिघे मित्र कधी कधी प्रसंगानुरुप एकमेकांच्या घरी देखील जात होते.

मयत संदीप बोरसे

शिक्षक असलेल्या संदीपची पत्नी दिसायला देखणी होती. चारचौघात तिचे तारुण्य उजळून दिसत असे. बोलायला देखील ती मनमोकळी होती. त्यामुळे पती संदीपचे मित्र म्हणून घरात आलेल्या राकेश व शरद या दोघांसोबत ती मिळून मिसळून बोलत  होती. संदीप, शरद व राकेश या तिघांची मैत्री त्यांच्या घरात व गावात सर्वांना परिचीत झाली होती. त्यामुळे संदीपच्या गैरहजेरीत राकेश अथवा शरद हे दोघे आले तरी त्यांच्याबाबतीत कुणी शंका घेत नव्हते. तिघे मित्र अधूनमधून हॉटेलमधे ओली पार्टी करण्यासाठी देखील जात होते. त्यावेळी त्यांच्यात सर्व प्रकारच्या गप्पा होत असत.

मात्र हळूच चोरपावलांनी या मैत्रीत शरदच्या वासनेने शिरकाव केला. शरदच्या मैत्रीत वासनेची किनार तयार झाली होती. संदीपची पत्नी दिसायला देखणी होती. तिच्या तारुण्यावर शरदची नजर खिळली होती. संदीपच्या पत्नीला भेटण्यासाठी शरद मुद्दाम त्याच्या घरी एकटाच जाऊ लागला. संदीपच्या गैरहजेरीत दिवसागणिक त्याचे जाणे येणे जरा जास्तच वाढले. शरद हा पती संदीपचा मित्र असल्यामुळे ती देखील त्याचे आदरतिथ्य करत होती. मात्र तो संदीपच्या गैरहजेरीत नेहमी नेहमी येऊ लागल्यामुळे तिच्या मनात शरदबद्दल शंका येण्यास वाव निर्माण झाला. सुरुवातीला तिने त्याच्या वागण्या – बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर तिला शरदच्या वागण्यात व बोलण्यात बदल जाणवला. आजूबाजूच्या महिलांच्या मनात देखील शंका निर्माण होण्यास जागा झाली होती. शरद नेहमी नेहमी संदीपच्या गैरहजेरीत का येतो? असा प्रश्न शेजारच्या महिला संदीपच्या पत्नीला विचारु लागल्या. संदीप घरी आल्यावर त्याची पत्नी त्याला सांगत असे की आज तुमचा मित्र शरद घरी येऊन गेला. त्याला काही काम नव्हते तो सहज आला होता. सुरुवातीला संदीपने देखील याकडे दुर्लक्ष  केले. मात्र हा प्रकार नेहमीचा झाल्याने त्याच्या मनात देखील शंका येऊ लागली.

कालांतराने शरदने लाजलज्जाच सोडली. तो केव्हाही, कधीही संदिपच्या पत्नीला भेटण्यासाठी येऊ लागला. मधल्या काळात त्याला टाळणारी संदीपची पत्नी आता मात्र शरदकडे आकर्षीत झाली. तिला त्याचे बोलणे आवडू लागले. तो केव्हाही आला तरी ती त्याचे आदरतिथ्य जोमाने करु लागली. तिला आता पती संदीप पेक्षा शरद जवळचा वाटत होता. नेहमी नेहमी घरी येणाऱ्या संदीपच्या मित्राबद्दल तिच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलला. सहवासातून तिच्या मनात शरदविषयी प्रेम निर्माण झाले. दोघात घनिष्ठ संबंध निर्माण झाले. वहिनी वहिनी म्हणत त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले. त्यात ती पुरती फसली. पतीच्या मित्रासोबत वाढत जाणारा तिचा सहवास घरातील इतर सदस्यांप्रमाणे परिसरातील महिलावर्गाला देखील खटकू लागला. आपल्या गैरहजेरीत शरद घरी येतो हे संदीपला समजले होते. मात्र पत्नीप्रमाणेच मित्र असलेल्या शरदवर त्याचा विश्वास होता. त्यामुळे सुरुवातीला त्याने दोघांकडे दुर्लक्ष केले.

दरम्यानच्या कालावधीत संदीपच्या पत्नीचे शरदसोबत असलेले प्रेमसंबंध चांगलेच बहरले. त्या प्रेमाला चांगला आकार आला होता. दोघांनी प्रेमात चांगलीच प्रगती केली. हा प्रकार संदीप व शरदचा तिसरा मित्र राकेशला देखील समजला. त्याने या प्रकरणी शरदला विचारणा केली. शरदने राकेशला सर्व काही सत्यकथन केले. संदीपच्या देखण्या पत्नीला शरदने आपल्या जाळ्यात चांगलेच ओढले होते. ती देखील शरदच्या जाळ्यात पुरती फसली होती. तो तिचा आनंद लुटत असल्याचे समजल्यानंतर राकेशला राग येणे अपेक्षीत होते. मात्र तसे मुळीच झाले नाही. आता शरदप्रमाणेच राकेशच्या मनात देखील वासनेचा शिरकाव झाला.

आपल्याला देखील एके दिवशी शरदप्रमाणे संदीपच्या पत्नीसोबत जवळीक साधण्याची संधी मिळेल या आशेने त्याने शरदच्या कृत्याचे समर्थन केले. हा मैत्रीवर एकप्रकारे आघात होता. शरद व राकेश आतून एक झाले होते. दोघे संदीपच्या पत्नीच्या कामुकतेकडे आकर्षित झाले होते. संदिपला दारु पिण्याचे भारी व्यसन होते. संदीपच्या एका मित्राने त्याच्या पत्नीसोबत जवळीक साधली तर दुस-याने त्याच्या कृत्याचे समर्थन केले होते.

आपल्या पत्नीचे आपलाच मित्र म्हणवणा-या शरदसोबत नको ती जवळीक असल्याचे समजताच संदीप हादरला होता. ज्या मित्रावर व ज्या पत्नीवर आपण विश्वास टाकला त्या दोघांनीच आपल्याला दगा दिल्याचे समजल्यानंतर तो मनातून दोघांवर चिडला होता. मात्र आपल्या संसाराचे हित लक्षात घेत त्याने आधी पत्नीला समजावले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे कमी प्रमाणात मद्य घेणारा संदीप आता जास्त प्रमाणात मद्यप्राशन करु लागला. त्याला दारु पाजणारे त्याचे दोघे मित्र आता एका पायावर तयार राहू लागले. ते स्वत:हून त्याला दारु पिण्याचे आमंत्रण देऊ लागले. दारु पिण्यास बोलावले म्हणजे शिक्षक संदीपची कळी खुलत असे. मात्र एकदा का त्याला दारुची नशा चढली म्हणजे तो शरदला चांगलीच शिवीगाळ करत असे. शरदची अक्षम्य चुक असल्यामुळे तो मुकाट्याने संदीपचे बोलणे ऐकून घेत होता. त्याशिवाय शरदकडे दुसरा दुसरा पर्याय नव्हता.

राकेश मात्र दोघांना शांत करण्याचा नाटकी प्रयत्न करत असे. संदीप व शरद यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट होते. वास्तविक तिघे एकमेकांचे मित्र होते. मात्र संदीपच्या पत्नीसोबत शरदचे संबंध उघड झाल्यापासून तो शरदचा वैरी झाला होता. राकेश देखील शरदचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन करत असल्याचे संदीपच्या लक्षात आले होते. त्यामुळे राकेश देखील संदीपचा वैरी झाला होता. आता तर शरद समोर दिसला म्हणजे संदीपच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. तो त्याला कुठेही भर रस्त्यात शिवीगाळ करण्यास मागे पुढे बघत नव्हता. संदीपकडून होणारा अवमान तो सहन करत होता. संदीप शरदला विश्वासघातकी म्हणत होता. त्यामुळे शरदला उत्तर देणे अशक्य झाले होते.  

मदिरा आणि मिनाक्षी या दोन घटकामुळे वाद वाढतच होता. शरदचे संदीपच्या पत्नीसोबत असलेले प्रेमसंबंध उघड झाले होते. त्यामुळे संदीपच्या पत्नीला भेटणे शरदला अवघड होऊन बसले होते. शरदच्या दृष्टीने संदीप हा त्याच्या वाटेतील अडसर होता. संदीपच्या पत्नीला शरद भेटू शकत नव्हता. संदीपला कायमचे संपवले तर हा अडसर कायमचा दूर होऊ शकतो असा विचार शरदच्या मनात चमकू लागला. याकामी शरदने राकेशची मदत घेण्याचे ठरवले. दोघांनी मिळून तसे नियोजन सुरु केले. संदीप आणि शरदचे वैयक्तीक संबंध खराब झाले असले तरी राकेश कोळीच्या मध्यस्थीने तिघेही मद्यपान करण्यास एकत्र जमत होते. मद्याच्या नशेतच तिघे जण आपापल्या घरी जात होते. तिघांचा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरातील सदस्यांना चांगल्याप्रकारे माहिती होता.

26 जून 2021 रोजी रात्री उशीरापर्यंत संदीप घरी आलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्य चिंतीत झाले. सध्या संदीप मोठ्या प्रमाणात मद्याच्या आहारी गेला होता. त्यामुळे घरात सर्वांना त्याची जास्त चिंता लागली होती. सर्व जण त्याचा शोध घेतच होते. दरम्यान त्यांना सरवड शिवारातील लामकानी रस्त्यावरील सप्तशृंगीमाता मंदिराच्या प्रवशेद्वारासमोर संदीपचा मृतदेह आढळून आला. एका अज्ञात वाहनाच्या धडकेत संदीपचा अपघात झाल्याचे परिसरातील बघ्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. अंधार असल्यामुळे धडक देणा-या वाहनासंदर्भात कुणीही व्यवस्थीत माहिती देत नव्हते.

संदीप मद्याच्या नशेत असतांना त्याला वाहनाचा धक्का लागला व त्यात तो गतप्राण झाल्याची परिसरात चर्चा सुरु होती. त्या अनुषंगाने सुयोग भानुदास बोरसे या संदीपच्या नातेवाईकाने सोनगीर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर संदीपच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनगीर पोलीस स्टेशनला संदीपच्या संदर्भात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असला तरी तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात होता.  त्याचे कारण म्हणजे संदीप आणि शरद यांच्यातील मित्रत्वाचे संबंध पार बिघडले होते. संदीप शरदला नेहमी शिव्या देत होता. त्यामुळे शरदनेच त्याचा घातपात घडवून आणला असावा असा संदीपच्या नातेवाईकाना दाट संशय होता.

त्यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच सोनगीर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.प्रकाश पाटील यांना रितसर अर्ज देवून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. संदीप बोरसेच्या नातेवाईकांचा पाठपुरावा बघता जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या निर्देशाखाली स.पो.नि. प्रकाश पाटील यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, हेड कॉन्स्टेबल संदेशसिंह चव्हाण, पोलीस नाईक शिरीष अदाणे, कॉन्स्टेबल अतुल निकम, अजय सोनवणे, राम बोरसे, संजय पाटील यांच्यासह सायबर सेलच्या मदतीने तपासकामाचे नियोजन केले.

स.पो.नि.प्रकाश पाटील यांच्या तपास पथकाने सरवड फाट्यापासून तर धुळे शहरातील नगावबारीपर्यंत मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल्स आणि ढाब्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या पाहणी दरम्यान तपास पथकाला धुळ्यातील नगावबारी परिसरातील हॉटेल सुरुची येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदीप बोरसेसोबत शरद दयाराम राठोड आणि राकेश मधुकर कोळी असे तिघे सोबत मद्यपान करतांना आढळून आले. हे तिघांनी तेथून इनोव्हा कारने प्रस्थान केल्याचे देखील निष्पत्र झाले. या फुटेजमध्ये शरद राठोडचे अस्तित्व लक्षात आले.

स.पो.नि. प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने अगोदर शरद यास ताब्यात घेतले. त्याने तपास पथकाची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. मात्र संदीपच्या मृतदेहाचा व त्या परिसराचा पंचनामा करतांना सापडलेला इनोव्हा कारचा लोगो आणि इनोव्हा कारच्या बंपरचा तुटलेला तुकडा आढळला होता. तो शरदला दाखवला असता शरदचे अवसान गळून पडले. त्यामुळे तो बोलता झाला. आपल्या अनैतिक संबंधातील काटा सारण्यासाठी तसेच आपल्याला वारंवार शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संदीपचे तोंड कायमस्वरुपी बंद करण्यासाठी शरदनेच नियोजन केले होते. त्या नियोजनात शरदचा साथीदार राकेशने संदीपला 26 जून 2021 रोजी रात्रीच्या वेळी धुळ्यातील नगावबारी परिसरातील हॉटेल सुरुची येथे आमंत्रण दिले होते. मद्य पिण्यासाठी हपापलेला संदीप तातडीने येतो हे दोघांना माहिती होते. शरदकडे असलेल्या कारमध्ये बसून ते तिघे देवभाने फाट्यावर सोबत आले.

सावध राहून शरद आणि राकेश या दोघांनी मिळून संदीपला येथेच्छ मद्य पिण्यास दिले.  त्यानंतर त्याला वाहनात बसवले. सरवड शिवारातील लामकानी रस्त्यावर घरी जाण्यासाठी वाहनातून खाली उतरवून दिले. मद्याच्या अतिसेवनामुळे अंधारात संदीपला धड चालता येत नव्हते. त्याचवेळी पुर्वनियोजनानुसार शरदच्या सांगण्यानुसार राकेशने संदीपला इनोव्हा य वाहनाची जोरदार धडक दिली. त्या जोरदार धडकेत संदीप जमिनीवर कोसळण्यास वेळ लागला नाही. या जबर धडकेत घटनास्थळावर इनोव्हाचा लोगो आणि बंपरचा तुकडा पडला. या धडकेच्या आवाजामुळे रस्त्यावरील काही पादचारी मदतीसाठी धावत आले.

दरम्यान अंधाराचा फायदा घेत इनोव्हासह दोघे पसार झाले. शरद राठोडचा जवाब पुर्ण झाल्यानंतर स.पो.नि. प्रकाश पाटील व त्यांच्या सहका-यांचा तपासाचा ताण हलका झाला. त्याच्या जवाबाच्या आधारे शरद राठोड व राकेश कोळी या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. दोघंविरुद्ध भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. शरद राठोड व राकेश कोळी दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here