नाशिक : नाशिकच्या गणेश चौकात बुधवार 28 जुलैच्या रात्री आठच्या सुमारास टोळक्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
देवळालीगाव येथील प्रसाद भालेराव हा त्याच्या मित्रांसोबत सिडको येथील गणेश चौकातील एका हॉटेलमधे जेवण करण्यासाठी आलेला होता. त्यावेळी एका तरुणासोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी हॉटेलमालकाने तो वाद कसाबसा मिटवत त्यांना बाहेर काढले होते.
दरम्यान संशयीत तरुणाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत प्रसादवर दगडाने डोक्यावर हल्ला केला. दगडाने केलेल्या हल्ल्यात प्रसाद गंभीर जखमी झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. दरम्यान संशयीत हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.